
काबूलहून येणारे अफगाणिस्तान एरियाना एअरलाइन्सचे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चुकून टेक-ऑफसाठी असलेल्या धावपट्टीवर उतरले. सुदैवाने त्यावेळी त्या धावपट्टीवर प्रस्थानासाठी दुसरे विमान नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
रविवारी दुपारी 12.06 वाजता काबूलहून येणाऱ्या एरियाना अफगाण एअरलाइन्सचे FG 311 या विमानाला रनवे 29 डाव्या (29L) वर उतरण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र वैमानिकाने चुकून रनवे 29 उजव्या (29R) वर विमान उतरवले.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, 29L ही धावपट्टी लँडिंगसाठी असून 29R प्रामुख्याने प्रस्थानांसाठी वापरले जाते. FG 311 ने टेक ऑफच्या धावपट्टीवर अनपेक्षितपणे लँडिंग केले तेव्हा धावपट्टीवर कोणतेही विमान उभे नव्हते. त्यामुळे सुदैवाने पुढील अनर्थ टळला. याबाबत आयजीआय विमानतळावरील अधिकारी या गंभीर चुकीबद्दल अफगाणिस्तानमधील त्यांच्या समकक्षांना पत्र लिहिणार आहेत, असे अहवालात म्हटले आहे.























































