प्लॅस्टिकविरोधी कारवाईत 16 लाखांची दंडवसुली, दोन हजार किलो माल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असून जुलैपासून 14 सप्टेंबरपर्यंत 318 जणांवर कारवाई केली असून तब्बल 15 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत 1 हजार 918 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आगामी काळात प्लॅस्टिकविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये पर्यावरण संतुलनासाठी जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर पालिकेच्या माध्यमातून दंड आणि कायदेशीर कारकाई करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे मुंबईत मागील दोन वर्षांपासून प्लॅस्टिकबंदी कारवाई थंडावली होती. मात्र 1 जुलैपासून पुन्हा धडाक्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

या प्लॅस्टिककर बंदी

50 मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या; प्लॅस्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश आहे.

…म्हणूनच घेतला प्लॅस्टिकबंदीचा निर्णय

50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशक्या  आरोग्याला घातक आणि पावसाळय़ात अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचण्याला कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यामुळे 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादनांवर बंदी घालून कारवाई करण्यात येत आहे.