
हर्षवर्धन दातार
शैलेंद्र सिंग मुळात अभिनेता बनण्याकरिता चित्रपटसृष्टीत आला होता. मात्र आधीच्या ‘नायकां’च्या गर्दीत त्याचा काही जम बसला नाही, पण गायक म्हणून त्याला बऱयापैकी यश मिळालं. आज आपण परामर्श घेणार आहोत या चित्रपटातील ‘पुरवैया लेके चली मेरी नैया’ या हलक्या-फुलक्या, पण मधुर युगुल गीताचा. हे गाणं आपल्याला प्रेमाच्या भरती आणि ओहोटीतून एका सागरी सफरीवर घेऊन जातं.
’दो जासूस’ 1975 साली हा विनोदी धमाल चित्रपट प्रदर्शित झाला होता. राज कपूर आणि राजेंद्र कुमार हे ‘संगम’ प्रसिद्ध अभिनेते या वेळेला डिटेक्टिव्ह जोडीच्या भूमिकेत दिसतात. त्या काळचा नवोदित गायक शैलेंद्र सिंग नायकाच्या भूमिकेत आणि गुजराती रंगमंच कलाकार भावना भट्ट नायिकेच्या भूमिकेत दिसतात. शैलेंद्र सिंग मुळात अभिनेता बनण्याकरिता चित्रपटसृष्टीत आला होता. मात्र आधीच्या ‘नायकां’च्या गर्दीत त्याचा काही जम बसला नाही, पण गायक म्हणून त्याला बऱयापैकी यश मिळालं. आज आपण परामर्श घेणार आहोत ‘दो जासूस’ या चित्रपटातील ‘पुरवैया लेके चली मेरी नैया’ या हलक्या-फुलक्या, पण मधुर युगुल गीताचा.
चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात हे मधुर गाणे मच्छीमारांच्या होडक्यावर आणि तस्करांचा पोलीस करीत असलेला पाठलाग या पार्श्वभूमीवर चित्रित झाले आहे. रवींद्र जैन यांनी लिहिलेल्या आणि संगीत दिलेल्या या गाण्याला स्वर दिले आहेत शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी. महासागरात जहाज घेऊन जग पादांत करणे कोलंबससारख्याला पाम वाटेल, पण एका मच्छीमाराला आपल्या छोटय़ाशा होडक्याला घेऊन रोज त्याच सागराशी झुंज देऊन आपली जिविका चालवणे एका युद्धासारखे आहे. जसे कोळी आपलं सर्वस्व पणाला लावून त्या सागराला शरण जातात, त्याचप्रमाणे अशोक (शैलेंद्र सिंग) आणि पिंकी (भावना भट्ट) आपल्या एकत्रित आयुष्याची होडी जीवनसागरात लोटून त्याला शरण जातात. हे गाणं आपल्याला प्रेमाच्या भरती आणि ओहोटीतून एका सागरी सफरीवर घेऊन जातं. पडद्यावर आपल्याला सागरावर हेलकावे घेत असलेल्या अनेक होडय़ा दिसतात. सुरुवात सुंदर वाल्ट्झ संगीताने होते आणि पुढे कोरस ढोलकीच्या तालावर दरियाराजाला आवाहन करतात…
दरियाचा राजा देवा हो देवा
तुम्ही गो माझा देवा हो देवा
तेरे भरोसे छोड दि नैया
नैया का अब तो तू हि खीवय्या
हे सागरा, दर्याराजा, तूच आमचा देव, तूच आमचं सर्वस्व. तुझ्या आधारावर आम्ही आमची होडी सागरात लोटतो आहोत. तूच आमचा रक्षणकर्ता, तूच आमचा नावाडी आहेस. बॅकग्राऊंडमध्ये या कोरसबरोबर मुख्य गाण्याची सुरुवात लताजींच्या सुरेख आलापाने होते…
पुरवैया लेके चली मेरी नैया,
जाने कहां रे, जाने कहां रे
पिंकी प्रेमाच्या या सफरीवर वाटचाल करायला तयार आहे. मात्र त्याचबरोबर किंचित साशंक पण आहे की, हे पूर्वी वारे तिला कुठे नेणार आहेत! अशोक तिच्या या शंकेला योग्य ते उत्तर देतो…
गोरी गोरी, जाना हमे अब कहाँ रे
तू भी यहां रे, मैं भी यहाँ रे
तू आणि मी एकत्र असताना आता कुठे जायची काळजी कशाला? आपण एकत्र आहोत हेच आपलं गंतव्य. इथे आता कॅमेरा या बोटींवरून बाजूला होतो आणि तस्करांचा पाठलाग करणाऱया बोटीवर काही काळ केंद्रित होतो. त्या अनुषंगाने मधले संगीतसुद्धा बदलून रहस्यमयी सूर वाजतात. इथे चेल्लो आणि व्हायोलिन्सचा सुंदर उपयोग केला आहे…
सागर मे जितनी तरंगे है
मनवा मे उतनी उमंगे है
अशोक-पिंकी उभयता आपल्या पुढील आयुष्याची स्वप्ने बघतात. या सागरात जितक्या लाटा आहेत, तितक्याच आपल्या इच्छा, आकांक्षा आहेत…
मौसम ये कितना सुहाना है
सब के लबो पे तराना है
हम भी गा ले, मीठे तराने मिलन के
प्यारा समा रे
सभोवताली सगळा निसर्ग किती सुंदर, मोहक आहे, सर्व जण गाणी गात आहेत. आपण पण गाऊ या प्रेमाची, गोड मीलनाची गाणी.
डुबा हूं मै तेरी आँखो मे
खोया हूं मंझिल की राहों मे
आँखो को साजन झुकाना ना
बन के पागल भटकी हूं मै तेरे कारण
कहाँ कहाँ रे
इथे पुन्हा एकदा मधल्या संगीतात सूर रोमँटिक मूड बदलून रहस्यमय होतात. बाहेर अथांग सागर आहे आणि मी तुझ्या डोळ्यातील प्रेमाच्या अथांग सागरात आकंठ बुडालो आहे. प्रेमाच्या या सफरीत हरवलो आहे. दुसरीकडे पिंकी मधून मधून चिंतीत होते, तिच्या भावनांतून असुरक्षितता व्यक्त होते. तुझ्या नजरेतून मला कधीही दूर करू नकोस. तुला गवसण्याकरिता मी वेडय़ासारखी वणवण भटकले आहे, तुझ्याकरिता जंग जंग पछाडले आहे…
दुष्मन ये सारा जमाना है
बच के हमे दूर जाना है
कहने को अपनी जुदाई थी
सांसो मे तूही समाई थी
मैं तो हारा तेरी मुहब्बत के खातीर
दोनो जहाँ रे…
गाण्याच्या या टप्प्यावर अनेक दिवसांच्या विरहानंतर आता दोघे एकत्र एकाच नावेत दिसतात. जग नेहमीच प्रेमी युगुलांच्या विरोधात असतं. आपल्याला या जगापासून दूर आपलं वेगळं प्रेमाचं विश्व निर्माण करायचं आहे. बरेच दिवस आपण वेगळे झालो होतो, पण आता एकमेकांच्या जवळ आहोत. माझ्या श्वासात, रोमारोमांत तूच नेहमी होतीस. तुझ्या प्रेमासमोर मी सगळं काही हरलो आहे. इथे गाण्याच्या सुरुवातीचा कोरस आणि मुखडा रिपीट होऊन गाणे संपते. संगीतकार रवींद्र जैन यांनी वाद्यमेळात कोंगो, चेल्लो, व्हायोलिन्स, ढोलक, कीबोर्ड आणि मुख्य म्हणजे कोरसचा (समूह) अतिशय कल्पक आणि योग्य वापर करून गाण्यात समुद्री हवेसारखी खुमारी आणली आहे. लताजींच्या तार सप्तकातील गायकीला शैलेंद्र सिंगने खालच्या पट्टीतील सुरांतून योग्य जोड दिली आहे.
पडद्यावर भावना भट्टने आपल्या चेहऱयातील बदलत्या हावभावातून पिंकीची संभ्रमावस्था आणि अशोकवरचे प्रेम छान व्यक्त केले आहे. शैलेंद्र सिंगने अभिनयापेक्षा गाण्यातून उत्तम साथ दिली. सत्तरच्या दशकात ‘ओसिबिसा’ हा एक नावाजलेला आफ्रिकन पॉप संगीत समूह होता. ‘वोयाया’ या त्यांच्या एका गाण्यातून रवींद्र जैन यांनी प्रेरणा घेतली आणि त्याला हिंदुस्थानी आणि काही प्रमाणात कोळी संगीताचा बाज देऊन एक उत्कृष्ट गाणं तयार केलं. राज कपूर आणि राजेंद्र कुमारच्या विनोदी भूमिका असलेला हा चित्रपट माफकच चालला. हे गाणं मात्र आपली लोकप्रियता आजही टिकवून आहे. सुंदर छायाचित्रण आणि संकलनामुळे हे गाणं अतिशय श्रवणीय आणि देखणं झालं आहे. सत्तरच्या दशकात रवींद्र जैन (9 ऑक्टोबर हा त्यांच्या स्मृतिदिन) यांनी संगीत दिलेले चित्रपट खूप चालले. गाण्यातले सरळसोपे शब्द आणि त्याला तशीच समर्पक सोपी चाल, हिंदुस्थानी बाजाबरोबर पाश्चात्त्य ठेका या अभिनव मेळामुळे त्यांची गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)





























































