दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठी समस्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहशतवाद ही जगासमोरील सर्वात मोठी समस्या असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. इतकेच नव्हे तर दहशतवादाला पाठबळ पुरविणाऱ्य़ा आणि समर्थन करणाऱ्य़ा देशांना दोषी ठरवायला हवं, अशी सूचना करत त्यांनी पाकिस्तानवर टीकेची झोड उठविली आहे.

12 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन भाग घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील टीकास्त्र सोडले. या शिखर परिषदेचे आयोजन रशियाचे पंतप्रधान क्लादिमीर पुतिन यांनी केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचे अभिनंदन देखील केले. यावेळी पुतिन यांच्यासह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोलोसोनेरो आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष क्रील रामपोझा हे देखील उपस्थित होते.  या परिषदेत दहशतवाद विरोधी भूमिका ठरविली जाण्याची शक्यता आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये बदलाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ग्लोबल गर्व्हनर्सच्या संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या विश्वासहर्ता आणि परिणामकारता दोन्हीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्याचे मुख्य कारण या संस्थेमध्ये काळानुसार बदल करण्यात आलेले नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या सर्व सर्व संस्था 75 वर्षे जुन्या जगाच्या मानसिकतेवर आणि वास्तविकेतेवर अवलंबून आहेत. त्यामुळे यूएन सुरक्षा परिषदेत बदल होणे गरजेचे असल्याचे मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

आत्मनिर्भर हिंदुस्थानाचे महत्त्व केले अधोरेखित

यावेळी आत्मनिर्भर हिंदुस्थानचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यामुळे कोविड 19च्या महारीनंतर देखील वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी एक व्यापक अभियान सुरु झाले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर या आत्मनिर्भर हिंदुस्थानामुळेच तब्बल 150 हून अधिक देशांना आवश्यक ती औषधे पाठविली आहेत. आमच्या देशात वैक्सिन उत्पादन आणि पुरवठा करण्याची क्षमता आहे, जी मानवतेच्या हितासाठी कामी येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

व्यापार वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल

आज जगातील 42 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही हिंदुस्थानात आहे. आमचा देश जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य इंजिन आहे. त्यामुळे कोविडनंतर जागतिक स्तरावरील रिकव्हरीमध्ये ब्रिक्स अर्थव्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार असून ब्रिक्स देशांतर्गत परस्पर व्यापाराला चालना देण्याचा मोठा वाव असेल, असे ही ते म्हणाले.