पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे. बुधवारी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणाऱ्या या बैठकीत मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री सहभागी होणार आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह प्रमुख वरिष्ठ मंत्री उपस्थित असणार आहेत.

मंगळवारी देशवासीयांशी संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी 17 मे नंतर लॉकडाऊन पुढे आणखी वाढवण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु लॉकडाऊन -4 आधीपेक्षा वेगळे असणार आहे. अर्थव्यवस्था आणि जीवन दोन्ही एकाचवेळी रुळावरून चालवण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. मोदींनी याबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांकडून काही सूचनाही मागवल्या होत्या. याच संदर्भात आणि लॉकडाऊन-4 कसे असावे याबाबत आराखडा तयार करण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली असावी अशी शक्यता आहे.

लॉकडाऊन वाढल्यामुळे मजुरांच्या समस्या वाढत आहेत. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत, मात्र अनेक ठिकाणी अजूनही आंदोलन होत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे छोटे उद्योजक अडचणीत आले आहेत, त्यांच्या समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता.