
सामना प्रतिनिधी । नगर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये प्रचार सभा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बरेड यांनी दिली आहे. सदरची सभा ही नगरच्या निरंकारी भवनामागील (सावेडी) मैदानात येथे सकाळी 9.30 च्या दरम्यान होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सभांचे नियोजन केले जात आहे. याच मैदानावर 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. गेल्या आठ दिवसापासून सभेचे नियोजन आखण्यात येत आहे. उन्हाचा कडाका सुरू होण्याआधी सकाळी 9.30 ला या सभेचे नियोजित करण्यात आले आहे. नगर दक्षिणमधून येणार गर्दी लक्षात घेऊन पार्किंगची व्यवस्था देखील त्या त्या पध्दतीने करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलिस अधिक्षक इशू सिंधू यांनीसुध्दा या ठिकाणची पाहणी करुन आढावा बैठक देखील घेतली आहे.
मागच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही याच निरंकारी भवन मैदानावर मोदींची सभा झाली होती. त्या वेळी दीड-दोन लाखांवर जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर सहा-सात महिन्यांतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मोदी राहुरीला आले होते. त्यानंतर आताच काही महिन्यांपूर्वी शिर्डी येथील घरकुलवाटप कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यामुळे शुक्रवारची त्यांची नगरची सभा हा जिल्ह्यातील त्यांचा चौथा दौरा ठरणार आहे. 2009 मध्येही चर्चेत असलेले मोदी नगरला सभा घेणार होते.


























































