पंतप्रधान मोदी पुन्हा तीन देशांच्या टूरवर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा तीन देशांच्या विदेश दौऱयासाठी सोमवारी रवाना झाले. मोदी यांचा हा दौरा चार दिवसांचा असून या दौऱयात ते जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान अशा तीन देशांत जाणार आहेत. 15 ते 16 डिसेंबर मोदी जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरे बिन अल हुसेन यांच्याशी चर्चा करतील. 16 ते 17 डिसेंबरला मोदी इथिओपियाचा दौरा करतील, तर 17 आणि 18 डिसेंबरला मोदी ओमानमध्ये असतील. पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी जगातील अनेक देशांचा चार-चार, पाच-पाच वेळा दौरा केला आहे, परंतु मोदी इथिओपियाचा पहिल्यांदा दौरा करत आहेत. 2023 मध्ये मोदींनी ओमानचा दौरा केला होता. आता पुन्हा एकदा ओमानचा दौरा करणार आहेत.

विदेश दौरे अधिवेशन काळातच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विदेश दौरे केले आहेत. त्यातील 85 टक्के दौरे हे अधिवेशन काळात केले आहेत. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू असताना मोदी हे तीन देशांच्या दौऱयासाठी रवाना झाले आहेत. मोदी यांच्या विदेश दौऱयावरून काँग्रेसने ‘संसद चले देश में, मोदी चले विदेश में,’ अशी जोरदार टीकाही केली आहे.