मुंबईतून पुण्याला 23 मिनिटांत; हायपरलूप प्रकल्पाचे लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतून पुण्याला केवळ 23 मिनिटांत सुपरसॉनिक स्पीडने पोहोचवणाऱया मुंबई-पुणे मार्गावरील अतिशय महत्त्वाकांक्षी हायपरलूप प्रकल्पाचे याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पामुळे देशातील परिवहन क्षेत्रात क्रांतिकारक पर्व सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना असल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱयाने सांगितले. मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान 117. 50 कि.मी. अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे 70 हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. विशेष म्हणजे अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. हायपरलूपचा वेग प्रति तास 496 किमी अपेक्षित असून त्यामुळे मुंबईतून पुण्याला फक्त 23 मिनिटांत पोहोचता येईल.

सात वर्षांत प्रकल्प पूर्ण
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून या टप्प्यात 11. 80 किमी लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षांत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प सहा ते सात वर्षांत पूर्ण करण्यात येईल.