
अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एक मिनी हिंदुस्थान आहे. इथे उर्दू, हिंदी, अरबी, संस्कृत शिकवले जाते. ग्रंथालयात पुराण आहे. त्याचबरोबर अनुवादित केलेले गीता, रामायणही आहे. येथे शिक्षण घेतलेले लोक जगातील कोणत्याही भागात हिंदुस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना दिसतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी, एएमयूच्या भिंतींवर देशाचा इतिहास कोरलेला आहे. इथे शिक्षण घेणारी विद्यार्थी जगात देशाचे नाव उजागर करत आहेत. या विद्यापीठात इस्लामविषयी जे संशोधन केले जाते, त्यामुळे हिंदुस्थानचे इस्लामिक देशांशी संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाल्याचे सांगितले.




























































