
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अमेरिका दौर्याच्या पहिल्या दिवशी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेतील पाच प्रमुख कंपन्यांच्या सीईओंसोबत चर्चा केली. मोदींनी बडया कंपन्यांना हिंदुस्थानात विविध व्यापक संधी असल्याचे सांगितले. त्यावर पाचही सीईओंनी हिंदुस्थानसोबत व्यावसायिक संबंध भक्कम करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, मोदींची शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये बैठक होणार आहे.
मोदींनी गुरुवारी एडोबचे शंतनु नारायण, जनरल एटॉमिक्सचे विवेक लाल, क्वालकॉमचे क्रिस्टियानो आमोन, फर्स्ट सोलरचे मार्क व्हिडमार आणि ब्लॅकस्टोनचे स्टीफन ए श्वर्जमॅन यांच्याशी चर्चा केली. यात दोन हिंदुस्थानी अमेरिकन सीईओंचा समावेश आहे. आमोन यांनी 5जीसह इतर महत्त्वाच्या डिजीटल उपक्रमांमध्ये हिंदुस्थानसोबत काम करण्यास इच्छा प्रकट केली. हिंदुस्थान एक मोठी बाजारपेठ आहे. आम्ही या बाजारपेठेकडे मोठे एक्सपोर्ट मार्पेट म्हणून पाहत असल्याचे ते म्हणाले. अन्य सीईओंनीही हिंदुस्थानसोबत संबंध बळकट करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तीन दिवसांच्या दौर्यात मोदी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत.
























































