
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 हिंदुस्थानी जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाचा भडका उडाला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱयाच दिवशी दिल्लीत ‘वंदे भारत’ एक्प्रेसचे उद्घाटन केले.
देशातील ही पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन दिल्लीपासून मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसाठी आहे. ही एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी हे 820 कि.मी.चे अंतर 9 तास 40 मिनिटांत कापणार आहे. ‘वंदे भारत एक्प्रेस’च्या उद्घाटनाला रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे सदस्य उपस्थित होते.
‘वंदे भारत’ एक्प्रेसचे उद्घाटन हे दहशतवादी हल्ल्याला दिलेले चोख उत्तर आहे. आमचे जवान आणि देशाचे नागरिक दहशतवाद्यांपुढे कधीही झुकत नाहीत. ‘26/11’ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर दुसऱया दिवशी त्या शहराने धैर्याचे दर्शन घडवले होते. तीच प्रेरणा पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱयाच दिवशी ‘वंदे भारत’ एक्प्रेसचे उद्घाटन करण्यामागे आहे. – पीयूष गोयल, रेल्वेमंत्री
























































