
नुकतंच हिंदुस्थानने 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचा टप्पा पूर्ण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन केले तसेच लसीकरणात ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली असे मत आज मन की बातमध्ये त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच गुजरातमधल्या भावनगरमध्ये ड्रोनच्या मदतीने शेतांमध्ये नॅनो-युरिया शिंपडण्यात आले. ड्रोनने कोविड लसीकरण मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली याचे एक छायाचित्र आपण मणिपूरमध्ये पहायला मिळाले होते. तिथं एका बेटावर ड्रोनच्या माध्यमातून लस पोहोचविण्यात आली. तेलंगणामध्ये ड्रोनच्या मदतीने लस पोहोचवली गेली. इतकेच नाही तर आता पायाभूत सुविधांसाठी अनेक मोठया प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या वर्षी 15 ऑगस्टला देशाने एक नवीन ड्रोन धोरण जाहीर केलं आहे. ड्रोनशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातल्या अनेक शक्यतांचा हिशेब लक्षात घेऊन हे धोरण निश्चित केले आहे. यामध्ये आता अनेक अर्ज भरावे लागणार नाहीत, त्यांच्या मंजुरीसाठी फेऱ्य़ा माराव्या लागणार नाहीत. तसेच आधी द्यावी लागत होती, तितके शुल्कही लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नवीन ड्रोन धोरण आल्यानंतर अनेक ड्रोन स्टार्ट अप्समध्ये विदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. अनेक कंपन्या ड्रोन निर्मितीचे प्रकल्पही उभे करीत आहेत. देशाच्या युवकांनी ड्रोन धोरणानंतर निर्माण झालेल्या संधींचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने जरूर विचार करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

























































