ज्या शहरात आहात तिथेच राहा, गावाकडे परतणाऱ्यांना पंतप्रधानांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीनशेच्या पार पोहोचली आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. देशभरातील दुकाने व कार्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कामानिमित्त गावाकडून शहरात आलेले लोकं कोरोनाच्या भीतीने पुन्हा गावाकडे जाण्यासाठी रेल्वे व बस स्थानकांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या भरून वाहत आहेत. या गाड्यांमध्येही कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चाकरमान्यांना ज्या शहरात आहात त्या शहरात राहण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून हे आवाहन केले आहे.

‘कोरोनाच्या भीतीने माझे बरेचसे भाऊ बहिण जिथे पोटापाण्यासाठी गेले आहेत ते शहर सोडून आपल्या गावात परतत आहेत. गर्दीत प्रवास करून कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जात आहात तिथल्या लोकांसाठी तुम्ही संकट घेऊन जात आहात. तुमच्या गावाच्या व परिवाराच्या संकटांत वाढ करत आहात. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्या शहरात आहेत, तिथेच राहा. यामुळे हा आजार पसरण्यावर रोख लागू शकते. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन वर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशी खेळ करत आहोत. त्यामुळे कृपया आपल्या कुटुंबाची व आपली चिंता करा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.