देशावरील संकटाचे नेमके स्वरुप काय? पतंप्रधानांच्या ‘काटकसरी’च्या आवाहनावर अंबादास दानवे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला केलेल्या आवाहनावरून सध्या देशभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांकडून देखील मोदींनी जनतेकडे केलेल्या त्यागाच्या मागणीवरून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधान परिषदेतील आमदार अंबादास दानवे यांनी या आवाहनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारले आहेत.

”पाच राज्यांच्या निवडणुका आटोपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून ‘काटकसर’ करण्याचे आवाहन केले. यापूर्वीही अनेकवेळा देश संकटाच्या काळात एकसंघपणे उभा राहिला आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, कालचे भाषण पाहता काही प्रश्नांची उत्तरे सरकारने देशासमोर अगदी कागदावर मांडायला हवीत” असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

X वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न केले आहेत. ते प्रश्न खालील प्रमाणे

​१. संकटाचे स्वरूप: देश संकटात आहे, तर या संकटाचे नेमके स्वरूप काय आणि ते किती गंभीर आहे, हे आकड्यांच्या आधारे स्पष्ट करावे.

​२. इंधन वापर: देशाला दररोज किती इंधन लागते आणि त्याचा वापर नेमका किती टक्क्यांनी खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे?

​३. सुवर्ण बाजार आणि रोजगार: “सोने खरेदी टाळा” असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे; मात्र खाणींपासून ते सोन्याच्या दुकानांपर्यंत काम करणाऱ्या कामगारांची साखळी आणि त्यांचे उपजीविकेचे साधन वाचवण्यासाठी सरकारने काय योजना आखली आहे?

​४. शेतीवर परिणाम: सध्या देशभरात शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. अशा वेळी शेतीसाठी लागणाऱ्या इंधनावरही सरकार काही निर्बंध लावणार नाही ना?

​५. शिक्षण आणि दळणवळण: ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यालयांसाठी योग्य असले, तरी १५ दिवसांनी सुरू होणाऱ्या शाळांचे काय? विद्यार्थ्यांनी शाळेत कसे जायचे आणि त्यांच्या प्रवासाचे नियोजन काय असेल?

​६. नैसर्गिक खते: रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांकडे वळणे ही चांगली बाब आहे, पण देशाला लागेल तितक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खतांची निर्मिती करण्यास आपण सध्या सक्षम आहोत का?