
हिंदुस्थानला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं; पण याच देशाचं महत्त्वाचं अंग असलेला भाग गोवा मात्र पुढे पंधरा वर्षे पारतंत्र्यात राहिला. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्याला वाऱयावर सोडलं. काँग्रेसने गोवा मुक्ती संग्राम चळवळ संपवली, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान मोदी यांची गोव्यातील म्हापसा येथे जाहीर सभा झाली. या वेळी मोदी म्हणाले, गोव्यात पर्यटन वाढलं तर देशाचंही पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी भाजपने पायाभूत सुविधांचा विकास केला. याआधीच्या सरकारच्या डोक्यात हा विषय नव्हता. ते दिल्लीत बसायचे आणि फक्त पर्यटनासाठी गोव्यात यायचे, असा टोला लगावला. भाजपच्या सत्ताकाळात मात्र गोव्यात बदल दिसून येत असल्याचे ते म्हणाले.


























































