
बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढय़ात माझा सहभाग होता. तेव्हा माझे वय 20-22 वर्षांचे असेल. मी आणि माझ्या सहकाऱयांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तुरुंगातही गेलो होतो, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी ढाका येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱयावर आहेत. ढाका विमानतळावर आगमन होताच पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचे स्वागत केले. परेड मैदानावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी बांगलादेश आणि हिंदुस्थानचे प्रयत्न सुरू होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होणे हे माझ्या आयुष्यातील सुरूवातीच्या टप्प्यातील आंदोलन होते. मी त्यावेळी 20-22 वर्षांचा असेल.
मी आणि माझ्या सहकार्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान सर्वांनाच माहित आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ात शहीद झालेले हिंदुस्थानी जवान, मुफ्ती सेनेचे जवान, नागरिक यांना आदरांजली वाहिली.
शेख मुजीबुर रहमान यांना ‘गांधी शांतता पुरस्कार’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशचे निर्माते दिवंगत शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर गांधी शांतता पुरस्काराने सन्मानीत केले. शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हा पुरस्कार स्विकारला.




























































