
स्वदेशी वस्तूच खरेदी करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना केलं. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले की, लोकांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे की, “मी स्वदेशी वस्तूच खरेदी करतो. आपण हिंदुस्थानात बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. याचा फायदा लहान व्यवसायांना होईल. आपण स्वावलंबनाचा मार्ग अवलंबला पाहिजे. हिंदुस्थानात ज्या काही वस्तूनाचे उत्पादित करता येते ते येथेच करा.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्याप्रमाणे स्वदेशीच्या मंत्राने देशाचे स्वातंत्र्य बळकट झाले, त्याचप्रमाणे स्वदेशीच्या मंत्राने देशाची समृद्धीही बळकट होईल. विकसित हिंदुस्थानचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला स्वावलंबी होण्याचा मार्ग अवलंबावा लागेल आणि आपल्या MSMEs वर हिंदुस्थानला स्वावलंबी बनवण्याची मोठी जबाबदारी आहे.
जीएसटी वर बोलताना मोदी म्हणाले की, “देशात उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव सुरू होत आहे. या जीएसटी बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करणे सोपे होईल. या बचत महोत्सवामुळे सर्वांना खूप फायदा होईल आणि आनंद होईल. बचत महोत्सवाचा सर्वांनाच फायदा होईल. देशाच्या विकासाची गती वाढेल.”
ते म्हणाले, “जीएसटीमध्ये कपात झाल्यामुळे, आता नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. बहुतेक दैनंदिन वस्तू अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. ९९ टक्के वस्तूंवर आता फक्त ५ टक्के कर आकारला जाईल.”