
सामना ऑनलाईन । मथुरापूर
महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच केली. हे गुंडच हिंसाचार घडवीत आहेत, पण पोलिसांकडून याचे पुरावे नष्ट केले जात आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला नरक बनविले असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पराभवाच्या भीतीने ममता बॅनर्जी यांना नैराश्य आले आहे. त्यामुळेच निवडणुकीनंतर मला तुरुंगात टाकण्याची धमकी त्या देत आहेत असे पंतप्रधानांनी फटकारले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रात्री 10 वाजता पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार संपला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या मथुरापूर आणि दमदम येथे दोन प्रचारसभा झाल्या. दोन्ही प्रचारसभांमध्ये पंतप्रधानांनी जोरदार हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसचा दुर्गापूजा, सरस्वती पूजेला विरोध आहे. जय श्री रामचा नारा देणे पश्चिम बंगालमध्ये गुन्हा ठरविला जातो. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या पक्षकार्यालयाचा कब्जा घेण्याची धमकी दिली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारामुळे लोकशाही बदनाम केली आहे असे टीकास्त्र पंतप्रधानांनी सोडले.
तृणमूलच्या गुंडांनीच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. हे पाप करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. पण पश्चिम बंगालचे पोलीस आरोपींविरुद्धचे पुरावेच नष्ट करीत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा भव्य पंचधातूचा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा उभारला जाईल अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.
‘स्टिकर’ दीदींना पाकच्या पंतप्रधानांचे कौतुक
ममता बॅनर्जींचा उल्लेख ‘स्टीकर’ दीदी असा करीत पंतप्रधान म्हणाले, दीदींना पश्चिम बंगालच्या विकासाचे घेणेदेणे नाही. केवळ केंद्र सरकारच्या प्रकल्पांवर स्वतःचे स्टिकर त्या चिकटवीत आहेत. दीदींचा विश्वास आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर नाही, परंतु पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक त्या करीत आहेत.
बुआ-भतीजाकडून राज्याची लूट
ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांच्यावरही पंतप्रधानांनी जोरदार हल्ला केला. या बुआ-भतीजा जोडीकडून पश्चिम बंगालची लूट सुरू आहे. जनता यांना कंटाळली असून भाजपला पश्चिम बंगालमध्ये 42 जागा मिळतील असे पंतप्रधानांनी सांगितले.

























































