पीएनबी घोटाळा – आता थकीत कर्जाचा घपला, 2617 कोटींची नोंदच नाही

642

स्टेट बँक ऑफ इंडियापाठोपाठ आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये (पीएनबी) 2617 कोटींच्या थकीत कर्जाचा घपला झाला आहे. या कर्जाची ताळेबंदात नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून पुढे आली आहे. या घोटाळ्याबाबत पीएनबीने शेअर बाजाराला कळवले असून यावर आता रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदीच्या तब्बल 14 हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्यामुळे पीएनबी आधीच संकटात आहे. त्यात आता थकीत कर्जे गायब झाली आहेत. रिझर्व्ह बँकेच्या तपासानुसार 2018-19 या आर्थिक वर्षात पीएनबीची एकूण 81,089.70 कोटी रुपयांची थकीत कर्जे होती, मात्र बँकेने लेखा परीक्षण अहवालात 78,472.70 कोटींची थकीत कर्जे असल्याचे घोषित केले. यातून एकूण थकीत कर्जे आणि जाहीर केलेली कर्जे यामध्ये 2617 कोटी रुपयांची तफावत उघड झाली आहे. बँकांकडून ताळेबंद वा लेखा परीक्षण अहवालातून थकीत कर्जे गायब करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवडय़ात स्टेट बँकेतील 12 हजार कोटींची थकीत कर्जे गायब झाल्याचे उघडकीस आले होते.

पीएनबीने निव्वळ थकीत कर्जे 30,037.66 कोटींची असल्याचे म्हटले होते. रिझर्व्ह बँकेच्या मूल्यांकनानुसार ही कर्जे 32,654.66 कोटींची होती.
थकीत कर्जांसाठीच्या तरतुदीमध्ये 2091 कोटी रुपयांची तफावत आढळली आहे. बँकेने थकीत कर्जांसाठी 48,151.15 कोटींची तरतूद केली होती. वास्तविक यासाठी 50,242.15 कोटींची तरतूद गरजेची होती.

तोटय़ातही घोळ
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार पीएनबीला गेल्या आर्थिक वर्षात 11,335.90 कोटींचा निव्वळ तोटा झाला होता, परंतु बँकेने 9,975.49 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे घोषित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या