विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या तक्रारींसाठी आता अॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
school32

सामना प्रतिनिधी । मुंबई

शाळेतील विद्यार्थी आणि विद्याथिनींच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्देश दिल्यानंतर आता राज्य शासनाने शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराची तक्रार करता यावी यासाठी POCSO e-Box व CHIRAG या अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली असून याची माहिती सर्वांना दिसेल अशी शाळेत लावावी. तसेच शाळेच्या परिसरात उपस्थित असताना विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शाळेचीच असेल असेही बजावण्यात आले असून विद्यार्थ्यांची दिवसातून तीनदा हजेरी घ्यावी असे सांगितले आहे.

मुलांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आदेश देताना न्यायालयाने काही निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने विद्यार्थी सुरक्षासंदर्भात मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

इजा होईल अशी शिक्षा नको

विद्यार्थ्यांना शिक्षा करताना शिक्षकांनी भान राखावे. त्यांना मानसिक वैंवा शारीरिक इजा होईल अशी शिक्षा करू नये. शिक्षक, पालक, कर्मचारी आणि यांची दक्षता समिती नेमावी. या समितीसोबत नियमित चर्चासत्र आयोजित करावे. ओळखपत्र पाहिल्याशिवाय विद्यार्थ्याला दुसऱयाच्या ताब्यात देऊ नका. अनेकदा आईवडिलांना किवा अधिकृत पालकांना वेळ नसल्याने नातेवाईक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेत येतात. या नातेवाईकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड अथवा अन्य अधिकृत ओळखपत्र तपासल्याशिवाय  विद्यार्थ्यांचा ताबा देऊ नका, अशी सक्त ताकीद दिली आहे.

मार्गदर्शक सूचना

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटीची    व्यवस्था हवी. शाळेच्या आवारात, प्रवेशद्वारावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

शाळेच्या प्रवेशद्वारावर महिला किवा पुरुष सुरक्षा रक्षक नेमावा.

शाळेच्या परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती येणार नाही याची दक्षता घ्यावी.

सकाळ, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची हजेरी बंधनकारक

अनुपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे कळवावे

शाळेतील मुलांचे व मुलींचे प्रसाधनगृह स्वतंत्र व पुरेसे अंतरावर असावेत

पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून प्रमाणपत्र मिळविलेल्या शिक्षक व कर्मचाऱयांची नियुक्ती करावी.