कवीच्या मनात त्याच्या कवितेतून डोकावता येते! संकेत म्हात्रे यांच्या इंग्रजी कवितासंग्रहाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कवीच्या मनात त्याच्या कवितेतून डोकावतात येते. कवीमनाचा ठाव घेणे खूप कठीण असते. त्यामुळेच तर कवीच्या कविता प्रसिद्ध होतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. तरुण कवी संकेत म्हात्रे यांचा पहिला इंग्रजी कवितासंग्रह ‘अ सिटी फुल ऑफ सायरन्स’चे प्रकाशन नुकतेच केतकर यांच्या हस्ते वरळीतील नेहरू सेंटर येथे झाले. याप्रसंगी केतकर यांनी या पुस्तकातील कवितांवरही प्रकाश टाकला.

‘अ सिटी फुल ऑफ सायरन्स’ या पुस्तकातील कविता म्हणजे कवीच्या भावनांचे प्रतिबिंबच आहे. कवीचे घर, संस्कृती, सामाजिक परिस्थिती, शहरातील जीवन याचे वर्णन कवितेतून मांडण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशनाला जेन भंडारी, अश्विनी कुमार, संकेत म्हात्रे यांचे वडील कवी अरुण म्हात्रे, कवी अशोक नायगावकर हेदेखील उपस्थित होते. प्रकाशनापूर्वी कवितावाचनाचा कार्यक्रम झाला. अभिनेता असीम हट्टंगडी आणि अभिनेत्री ऋग्वेदी विरेन यांनी पुस्तकातील कवितांचे खास वाचन केले. आभरपर भाषणात बोलताना संकेत म्हात्रे यांनी पुस्तक निर्मितीच्या कामात मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच आपला पहिला इंग्रजी कवितासंग्रह आपल्या आईला अर्पण केला. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी साकारले असून हवाकल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

मराठी कवींची इंग्रजी पिढी

मराठी कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करताना अचानक इंग्रजी कवितेने माझा हात धरला. या दोन भाषांच्या पुलाखालून माझा प्रवास चालू आहे. एक वेगळी सेन्सिबिलिटी आणि अस्तित्वाचा एक वेगळा अर्थ मला इंग्रजी कवितेतून मिळत गेला, असे संकेत म्हात्रे म्हणाले. अनेक मराठी कवी इंग्रजी कवितांमध्ये रमत आहेत. कवी म्हणजे फक्त कविता रचणारा नव्हे, तर आता उच्चशिक्षित, अन्य क्षेत्रांत करीअरच्या पहिल्या पायरीवर उभे असलेले अनेक तरुण कविता विश्वात जगत आहेत. ही तरुण कवी मंडळी म्हणजे मराठी कविता विश्वातील दिग्गजांची पुढची पिढीच आहे, असेही या वेळी बोलताना संकेत म्हात्रे यांनी सांगितले.