पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची जमवाजमव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पाकिस्तानने पुन्हा एकदा पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची जमवाजमव सुरू केली असून लाँचिंग पॅडही तयार केले आहेत. यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि पाकिस्तानी सैनिक दहशतवाद्यांना मदत करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे लाँचिंग पॅड तंगधार आणि उरी सेक्टरच्या समोर आहेत.

जम्मू-कश्मीर सीमेवरून पाकिस्तानचा पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न सुरू झाला आहे. रविवारी सीमेजवळील सुंदरबनी येथे दबा धरून बसलेल्या पाकड्यांनी जवानांवर हल्ला केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत. याच परिसरात दहशतवादी लाँचिंग पॅड लावून सज्ज आहेत. जवानांवर हल्ला केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानच्या गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त कश्मीरमधील तीन ठिकाणांवर मोठ्या संख्येने दहशतवादी जमले असून पाकिस्तानी सैनिकांचाही यात सहभाग असल्याचे समजते. हे दहशतवादी लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. तसेच जवानांवर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या बॅट टीमने मुजाहीदीन बटालियनही तैनात केली आहे. यामुळे पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी हिंदुस्थानला दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करावे लागेल, असे बोलले जात आहे.

दरम्यान, हिंदुस्थानी सैन्याने याआधीही पाकड्यांनी सीमेवर लावलेले लाँचिंग पॅड उद्ध्वस्त केले आहेत. उरी हल्ल्यानंतर जवानांनी २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी रात्री पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यामुळे पाकिस्तान चवताळला होता.