भिगवणमध्ये बेकादयेशीर वाळू तस्करी करणार्‍या दोन ट्रकवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिगवण 

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या  दोन ट्रकवर भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करत चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.  रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली. तासाभराच्या या कारवाईत वाळू व ट्रकसह एकूण १०  लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नवनाथ गणेश कदम   दुसरा ट्रकचालक अशोक निवृत्ती  या दोन्ही  ट्रकचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक गोरख पवार, इनक्लाब पठाण, पोलीस कॉन्सटेबल बापू हाडगळे हे तिघे भिगवण राशिन मार्गाने खासगी वाहनाने गस्त घालत असताना त्यांना धुमाळ पेट्रोल पंपाच्या हद्दीत   टाटा कंपनीचा एम एच ४५ डी ५७५७ या क्रमांकाचा ट्रक  भिगवण कडे जाताना दिसला. त्यावेळी त्याला थांबवून विचारणा केली असता त्यामध्ये बेकायदेशीर तीन ब्रास वजनाची वाळू आढळून आली त्याविषयी ट्रकचालकाकडे चौकशी केली असता वाळू वाहतूकीबाबत कसलीही रॉयल्टी भरलेली आढळून आली नाही. त्यावर वाळूसह ट्रकवर कारवाई करत पाच लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.  यामुळे पोलीस नाईक गोरख पवार यांच्या फिर्यादीवरुन सदर ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा ट्रक क्र. एम. एच. एन बी ७५७८ या ट्रकवरदेखील कारवाई करत तीन ब्रास वाळूसह ५ लाख तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.  पोलीस नाईक इनक्लाब  पठाण यांच्या फिर्यादीवरुन भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौण खनिजाचे उल्लंघन करून बेकायदेशीर वाळू चोरल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे दोन्ही ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री अशाच स्वरुपाची एका ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली असून यामध्ये वापरण्यात आलेल्या ट्रकचा नंबर बोगस असल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे  बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन करून वाळूची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.वाळूची  चोरटी वाहतूक करणारांनी धसका घेतला आहे.