नळदुर्गात अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; 5 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नळदुर्ग येथील कुरेशी गल्ली येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यावर बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. पोलिसांनी 20 जिवंत जनावरांसह कापलेल्या जनावरांचे मांस असा एकूण 5 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत आहेत. मात्र,नळदुर्ग शहरातील कुरेशी गल्ली येथे खुलेआम अवैधरित्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस बाहेर पाठविण्याचा उद्योग सुरु होता. राज्यात गोहत्त्याबंदी कायदा लागू आहे. मात्र याठिकाणी याचे उल्लंघन केले जात होते. नळदुर्गचा कत्तलखाना नगर परिषदेने बंद केला आहे. कत्तलखाना बंद असतानाही याठिकाणी दररोज मोठय़ा प्रमाणात जनावरांची कत्तल केली जात होती. लॉकडाऊनच्या काळातही नळदुर्ग येथे मोठय़ा प्रमाणात जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख, पोलीस उपनिरीक्षक अण्णा खाडेवाड, पोहेकॉ किशोर शेळके, पोलिस नाईक कुणाल दहिवडे, पोकॉ बलदेव ठाकुर, पोकॉ दीपक लाव्हरे पाटील व चालक संतोष गव्हाणे यांनी बुधवारी पहाटे कुरेशी गल्ली येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जनावरांच्या कत्तलीच्या ठिकाणी धाड घातली. यावेळी काही जनावरांची कत्तल करण्यात आली होती तर काही जनावरे जिवंत होती. यावेळी जनावरांचे मांस आणि जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पोहचण्य़ास उशीर झाला असता तर 20 जनावरांचीही कत्तल झाली असती. जप्त करण्यात आलेल्या 20 जनावरांमध्ये गायींचाही समावेश आहे. यावरून याठिकाणी गाय व गोवंश हत्त्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी याठिकाणाहून 20 जिवंत जनावरांसह जनावरांचे मांस असा एकूण 5 लाख 89 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुश्ताक चाँदसाब कुरेशी, महेबुब सादिक कुरेशी, रजाक चाँदसाब कुरेशी, सादिक अब्दूलसत्तार कुरेशी, मुनीर नशीर कुरेशी, शब्बीर अब्दुल अजीज कुरेशी आणि मुदस्सर गफार कुरेशी या सात जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.