
देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. सभा, समारंभ यांच्यावर बंदी आहे. लग्नसमारंभातही उपस्थितांची संख्येवर मर्यादा आहे. तरीही निर्बंध झुगारून अनेक ठिकाणी समारंभ, विवाह सोहळे होत आहेत. पंजाबमध्ये एका विवाह सोहळ्याला 200 जण जमल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस विवाहस्थळी दाखल होताच, वऱ्हाड्यांनी तर पळ काढलाच. पण नवरा नवरीही पळण्यासाठी धडपड करत होते.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पंजाबमध्ये विवाहसोहळ्यासाठी 20 जणांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. पटियालातील राजपुरा टाऊनमध्ये एका विवाहसोहळ्याला 150 ते 200 जण उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती मिळताच अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विवाहसोहळ्यात नवरानवरीसह कोणीही मास्क घातले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगसह कोणत्याही नियमांचे पान होत नसल्याचे पोलिसांना आढळले. पोलीसांचे पथक कारवाईसाठी आल्याचे समजताच विवाहस्थळी गोंधळाला सुरुवात झाली.
वऱ्हाडी बाहेर पडण्यासाठी धावतच सुटले. अनेकांनी भिंतीवरून उड्या घेत पलायन केले. पोलिसांच्या कारवाईपासून बचावासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. काहीजण भिंतीवरून उड्या मारून निसटल्याचे समजताच अनेकांनी भिंतीवरून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलिसांच्या करावाईच्या भितीने नवरा आणि नवरीचीही विवाहस्थाळाहून पळण्याची धडपड सुरू होती.
विवाह सोहळ्याला फक्त 20 जणच उपस्थित असल्याचे नववधूच्या आईने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलीस पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळाची परिस्थिती बघितली होती. त्यामुळे त्यांनी वधू आणि वर पक्षाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.





























































