
‘कोस्टा सेव्हिंग अॅपमध्ये पैसे गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा’ असे आमिष दाखवत त्या अॅपच्या माध्यमातून सध्या मोठय़ा प्रमाणात लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी तेलंगणात एक गुन्हादेखील झाला आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी या अॅपपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
सध्या बाजारात ‘कोस्टा अॅप’च्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी सापळा लावला जात आहे. ‘कोस्टा अॅपमध्ये पैसे गुंतवा आणि भरघोस परतावा मिळवा’ असे आमिष दाखवत पैसे गुंतवण्यास भाग पाडून संबंधितांची फसवणूक केली जाते, हा प्रकार सध्या मोठय़ा प्रमाणात होत असून त्याची दखल घ्या अशा आशयाचा एक ई-मेल मुंबई पोलिसांना आला होता. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या दक्षता विभागाने तत्काळ तपास सुरू केला. तेव्हा दोन आरोपी यात गुंतले असल्याचे तसेच याप्रकरणी तेलंगणा राज्यातल्या एका पोलीस ठाण्यात त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. जास्त परतावा मिळेल या आमिषाला बळी पडून नागरिक पैसे गुंतवतात आणि मग त्यांची फसवणूक होते. त्यामुळे ‘कोस्टा अॅप’पासून दूर रहा, त्यात कोणीही पैसे गुंतवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे ‘कोस्टा अॅप सेव्हिंग’ या नोंदणीकृत नसलेल्या अॅपविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये गुंतवणूकदारांना अवास्तव आणि अधिक प्रमाणात परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे आढळले आहे.




























































