
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीशी संपूर्ण जग लढत आहे. डॉक्टर्स सातत्याने मास्क वापरणे, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे अशा नियमांचे पालन करण्याची सूचना सातत्याने देत आहेत. तरीही काही गावातील लोकं अंधश्रद्धांना बळी पडून भलत्याच गोष्टींच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहेत.
मध्य प्रदेशातील चाटूखेडा गावातील दोन महिलांच्या अंगात पऱ्या आल्या आहेत. या गावातील लोक त्यांना ‘देवपरी’ असे म्हणतात. या पऱ्या ज्या व्यक्तिच्या अंगावर पाणी शिंपडतील त्याला कोरोना होणार नाही, अशी अफवा या गावात पसरली आहे. अफवा पसरल्यानंतर लगेचच गावातील लोक हजारोंच्या संख्येने चाटूखेडा गावात येऊ लागले. या महिलांकडून अंगावर पाणी शिंपडून घेऊ लागले. असाच प्रकार येथील राजगढ गावातही घडला. या अफवेनंतर पऱ्यांकडून पाणी अंगावर शिंपडून घेण्याकरिता येथील महिला, पुरुष मोठ्या संख्येने घरातून बाहेर पडले आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली. यावेळी सामाजिक अंतर पाळण्याचा नियम तर लोकं विसरूनच गेले होते. येथे पऱ्यांकडून पाणी शिंपडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या.
अखेर ही गर्दी आटोक्यात आणण्याकरिता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांना अफवेमुळे पसरलेली मोठ्या प्रमाणातली गर्दी आटोक्यात आणावी लागली. त्यानंतर ज्या महिलांच्या अंगात पऱ्या आल्याचे नाटक करत होत्या त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अशाच प्रकारची एक घटना झारखंडमधील रांची येथे घडली आहे. कोरोनाला घालवण्यासाठी येथील स्थानिक लोकं काही कार्यकर्त्यांना एकत्रित करून कोरोना विनाशक यज्ञ करत आहेत. मध्यप्रदेशातील राजगढमध्ये लोकांना लस घेण्याची भीत वाटतेय. प्रशासनाकडून इथल्या विविध परिसरांत लसीकरण जागरुकता अभियान राबवण्यात येत आहे, मात्र गावकऱ्यांवर या अभियानाचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. याचे कारण म्हणजे ब्यावरा क्षेत्रातील मोई आणि खानपुरा गावात असा गैरसमज आहे की, कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप येतो किंवा लस घेतलेली व्यक्ति मरते. त्यामुळे येथील लोक लस घेण्यापासून दूर राहात आहेत. घरातील एका ज्येष्ठ व्यक्तिचा लस घेतल्याने मृत्यू झाल्याने या गावातील लोक कोरोना चाचणी करत नाहीत आणि लसही घेत नाहीत आणि आरोग्य अधिकाऱ्यांनाही गावात येऊ देत नाहीत, आढळून आले आहे.




























































