
उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसाने लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्विकारताना त्याला रंगहात अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान व्यंकटराव गिरी (वय 32) असे त्या पोलिसाचे नाव असून ते पोलीस नाईक पादावर कार्यरत आहेत.
भगवान व्यंकटराव गिरी यांनी तक्रारदार यांच्या पत्नीविरुध्द पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता त्यांच्या बाजुने तपास करून मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार 23 नोव्हेंबर रोजी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडे दाखल करण्यात आली होती.
तक्रारीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात पोलीस नाईक भगवान गिरी यांनी तक्रारदार यांच्या पत्नीविरूध्द पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता त्यांच्या बाजुने तपास करून मदत करण्यासाठी सुरुवातीला 25 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रुपये लाचेची रक्कम ठरवण्यात आली. त्याचा पहिला हप्ता म्हणून 5 हजार रुपये लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. भगवान गिरी यांनी लाचेची रक्कम 5 हजार रुपये उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्विकारली. त्यावेळी पंचासमक्ष त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
गिरी यांच्याविरुध्द उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक पंडीत रेजितवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर करीत आहेत. सापळा कार्यवाही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, रमाकांत चाटे, भागवत कठारे, फारूख दामटे, पोलीस नाईक संतोष गिरी, अमर वाघमारे, शिवकांता शेळके, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दिपक कलवले, मंगेश कोंडारे, रुपाली भोसले, गजानन जाधव, राजु महाजन यांनी केली आहे.


























































