विष प्राशन करून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, राहुरीतील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेत पोलीस कॉन्स्टेबलने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री राहुरी शहरातील डुबीचा मळा येथे घडली आहे.

विशाल राम हापसे (वय – 35) असे मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशाल हापसे दोन महिन्यांपूर्वीच श्रीरामपूर येथून राहुरी येथे पोलीस ठाण्याला रुजू झाले होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

विशाल हापसे यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विष प्राशन केले. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने लोणी येथील ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’च्या दवाखान्यात उपचारांसाठी हलविले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी दुपारी लोणी येथे शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. देहरे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.