क्रिकेटमधील सट्टेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>> प्रभाकर पवार

अलीकडेच पार पडलेल्या हिंदुस्थानातील ‘आयपीएल’ क्रिकेट मॅच फिक्सिंग प्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी या देशातील पहिल्या टॉप बुकीमधील एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (मुंबईतील मालाड भागात राहणाऱ्या) सोनू योगेंद्र जालान ऊर्फ सोनू मालाड (४१) याच्यासह ६ आरोपींना गेल्या महिन्यात अटक केली. त्यांच्याकडून बनावट नावाने खरेदी केलेली बरीच सीम कार्ड व मोबाईल आदी ८ लाख रुपये किमतीची यंत्रसामग्री जप्त केली आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांत सामना सुरू असताना अटक केलेल्या आरोपींनी ‘सट्टा’ लावला होता. जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींना अटक केल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान हाही २ कोटी ८० लाख रुपयांचा सट्टा खेळला व त्यात हरला होता, असेही तपासात उघड झाले. ‘आयपीएल’ असो अथवा वन-डे… क्रिकेटवर बहुसंख्य सेलिब्रेटी सट्टा खेळतात, त्यात बॉलीवूडचे स्टारही आहेत. फक्त त्यांची नावे पुढे येत नाहीत. दर दोन-चार वर्षांनी क्रिकेट बेटिंगचे स्कॅण्डल बाहेर येते.

२०१३ साली ‘आयपीएल’मधील ‘स्पॉट फिक्सिंग’ घोटाळा उघडकीस आला होता. राजस्थान रॉयलचे खेळाडू श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण या क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन ‘आयपीएल’ क्रिकेट स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली होती. त्यांना दिल्ली पोलिसांनी ‘मोक्का’ही लावला होता. परंतु न्यायालयात तो टिकला नाही. अटकेत असलेले क्रिकेटपटू जामिनावर बाहेर पडले; परंतु त्यांची सारी क्रिकेट कारकीर्द संपली. या मॅच फिक्सिंगमध्ये दाऊद टोळी असल्याचे उघड झाले होते. आता ठाणे पोलिसांनी क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या व त्यात हरलेल्या अरबाज खानसारख्या सिनेअभिनेत्याला (पैसे चुकते करण्यासाठी) धमक्या देण्यासाठी रवी पुजारी टोळीचा वापर केला गेल्याने ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीवर ‘मोक्का’ची कारवाई केली आहे. म्हणजे दाऊद टोळीनंतर क्रिकेट बेटिंगमध्ये आता रवी पुजारीनेही शिरकाव केला असून पुढील ‘आयपीएल’मध्ये रक्तपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याआधीच केंद्र सरकारने ‘आयपीएल’ मॅचेस बंद कराव्यात, ‘आयपीएल’मुळे महिनाभर देशातील सारे पोलीस रस्त्यावर असतात, त्यांच्यावर कमालीचा ताण येतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे सांगितले जाते. परंतु यात राजकारण्यांचे हितसंबंध गुंतले असल्याने कुणी ‘आयपीएल’ बंद करण्याच्या भानगडीत पडेल असे वाटत नाही.

दाऊद जेव्हा दुबईत पळाला (१९८५) तेव्हापासून क्रिकेटवर सट्टा खेळला जात आहे. १९९६च्या विश्चषकातील उपांत्य फेरीचा वन-डे क्रिकेट सामना फिक्स होता. त्यात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची Involvement होती. त्यामुळेच आपण हरलो असल्याचा आरोप मध्यंतरी विनोद कांबळीने केला होता. तो खरा आहे. अझरुद्दीन, अजय जाडेजा व नयन मोंगिया आदी क्रिकेटपट्टू दाऊदचा उजवा हात शरद शेट्टीच्या संपर्कात होते. शरद शेट्टी हा क्रिकेट बेटिंग घोटाळय़ात होता, हे स्वतः दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने मुंबई क्राइम ब्रँचला स्टेटमेंट देताना सांगितले आहे. त्यामुळेच अझरुद्दीन, मोंगिया व जाडेजा यांच्यावर क्रिकेट खेळण्याची बंदी घालण्यात आली. गरीब क्रिकेटपट्टूंना आमिषे दाखवून विकत घेतले जाते. एकेकाळचा आयपीएल किंग ललित मोदी! ज्याने हिंदुस्थानात आयपीएलला जन्म दिला तो आज वॉण्टेड आहे. सीबीआय, ईडी त्याला शोधत आहेत. परंतु आयपीएलमध्ये करोडोचा घपला करून तो लंडनमध्ये सुखाने जगत आहे. यावरून इंडियन प्रीमियर लिगमध्ये किती गडगंज पैसा आहे याचा विचार करा! सट्टेबाजी- शिवाय क्रिकेट नाही! सचिन तेंडुलकरसारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके क्रिकेटपटू या व्यवसायात प्रामाणिकपणे आहेत. बाकी सर्वत्र जुगारच जुगार!!