भ्रष्टाचार हा सिस्टीमचा भाग, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्टाचार हा सिस्टीमचा भाग आहे. पोलीस आणि महसूल विभागांतील कर्मचाऱयांची संख्या अन्य विभागांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भ्रष्ट कर्मचाऱयांचा आकडा अन्य विभागांच्या तुलनेत कमीच आहे. आपण या प्रकाराचे समर्थन करीत नाही. भ्रष्टाचार करणारा अधिकारी किंवा कर्मचारी कुण्या वरिष्ठ अधिकाऱयाला विचारून करीत नसतो, असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले.

पोलीस महासंचालक नगराळे आज नागपुरातील पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्य पोलीस दलातील 339 पोलीस मृत पावले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस विभागात सामावून घेत नोकरी देण्यात येणार आहे. नागपूर पोलीस दलात 30 जणांच्या अनुपंपाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात रस्त्यावर पोलीस दिसावेत, जेणेकरून कामावर परिणाम होऊ नये. तसेच कोरोनापासून बचावसुद्धा व्हावा यासाठी उपाययोजना करीत आहोत.

पूजा चव्हाण आत्महत्येचा तपास योग्य दिशेने

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पोलिसांचा तपास तथ्यावर चालतो. असे झाले तर, तसे झाले तर अशा जरतरवर पोलीस तपास चालत नाही, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आत्महत्येचे आहे. पोलीस या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने करत आहेत. पूजा चव्हाण किंवा कुठल्याही तपासाबद्दल मीडियाला सांगणे बरोबर नाही.