पोलीस डायरी : ‘स्टेशनरी’ची मागणी भोवली

2658
bribe

लाचेची मागणी हजार व लाखातच मोठ्या प्रमाणात केली जाते. शेकड्यात कमी! हजार-पाचशे रुपये मागणार्‍या लोकसेवकांविरुद्ध सहसा कुणी लाचलुचपतविरोधी पथकाकडे तक्रार करीत नाही; परंतु अलीकडे जागरूकता कमालीची वाढली आहे. पाचपन्नास रुपये मागणार्‍यांविरुद्धही ऍण्टी करप्शनकडे धाव घेतली जाते. गेल्याच आठवड्यात झेरॉक्सच्या प्रती काढण्यासाठी लागाणार्‍या कागदाच्या रीमची तक्रारदाराकडे मागणी करणार्‍या सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या एका फौजदाराला व एका पोलीस शिपायाला त्यांनी केलेली मागणी चांगलीच भोवली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांताक्रुझ येथे सुजित महेंद्र पांडे यांच्या ऍक्सेल या मोटारीला अपघात झाला. कार डिव्हायडरला धडकल्यामुळे कारचे नुकसान झाले. सुजित पांडे यांनी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार केली; परंतु त्या तक्रारीची प्रत दिली नाही. झेरॉक्ससाठी लागणारी कागदाची ‘रीम’ संपली असल्याचे सांगून तक्रारदाराला स्टेशनरीचे सामान घेऊन येण्यास सांगितले. या अजब मागणीचा पांडेंना धक्का बसला. त्यांनी थेट मुंबईच्या वरळी येथील ऍण्टीकरप्शन कार्यालयात जाऊन सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील फौजदाराविरुद्ध तक्रार केली. दुसर्‍या दिवशी म्हणजे शनिवारी ऍण्टीकरप्शनच्या पथकाने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात साध्या वेशात सापळा रचला. तेव्हा तक्रारदार सुजित पांडे यांच्याकडून झेरॉक्सच्या कागदपत्रांचे ‘रीम’ स्वीकारताना सांताक्रुझ पोलीस ठाण्याचा फौजदार व शिपाई रंगेहाथ पकडले गेले. या आगळ्यावेगळ्या ‘ट्रप’ची बातमी सार्‍या पोलीस दलात वार्‍यासारखी पसरली आणि पोलिसांना धक्का बसला.

पोलीस ठाण्यात स्टेशनरी, खुर्च्या, टेबल व बसायला जागाही नसते हे सर्वश्रुत आहे; परंतु त्यासाठी आपली नोकरी धोक्यात घालून कुणाकडे स्टेशनरीची लाच किंवा ‘फेवर’ मागणे गैर आहे हे जरी खरे असले तरी सध्या पोलीस किती प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत यावर पुन्हा एकदा जळजळीत प्रकाश पडला आहे. मध्यंतरी पुण्यातील एका फौजदाराला तपासाकामी बाहेरगावी जायचे होते, आरोपींना पकडून आणण्यासाठी! त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. म्हणून त्याने एका कुल्फीवाल्याकडे लाच मागितली. कुल्फीवाला अनधिकृतपणे व्यवसाय करीत होता; परंतु फौजदाराला 20 हजारांची लाच देण्याइतके त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने ऍण्टीकरप्शनची मदत घेतली आणि त्या फौजदाराला ऍण्टीकरप्शनच्या ताब्यात दिले. गाईचे दूध काढण्याऐवजी तिचे रक्त काढल्यावर काय होणार? तेच येथे झाले आणि फौजदार लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला. पोलिसांना तपासकामी बाहेरगावी जायचे असेल तर त्यांच्याकडे वाहने नसतात. असतील तर कुचकामी, मध्येच रस्त्यात बंद पडणारी, बाबा आदम जमान्यातील असतात. मग कसे आरोपी सापडणार! त्यामुळे धडाकेबाज, कर्तबगार अधिकार्‍यांनाही कधी कधी सेवाभावी लोकांची मदत घ्यावी लागते. पोलिसांकडे सिक्रेट फंड असतो; परंतु त्याचा वापर बरेच वरिष्ठ स्वतःसाठी अधिक करीत असतात. त्यामुळेच झेरॉक्स मशीनसाठी लागणारा कागदही पोलीस ठाण्यात उपलब्ध नसतो. कागद नसल्यामुळे सांताक्रुझ पोलीस ठाण्याचा फौजदार तक्रारदाराला विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी लागणारी तक्रारीची झेरॉक्स प्रत देऊ शकला नाही. तक्रारदाराला प्रतीसाठी धक्के खावे लागल्यामुळेच त्याने पोलिसांना धडा शिकविला; परंतु तक्रारदारामुळे आज दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ‘ट्रॅप’ झालेल्या पोलिसांना जेलमध्ये जावे लागले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवरही नामुष्कीची वेळ आली आहे. तेव्हा पोलिसांनी कुणाचेही ‘फेवर’ घेण्यापूर्वी, लाच मागण्यापूर्वी दहावेळा विचार केला पाहिजे. लोकांना त्रास देऊन त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याकडून काही चीजवस्तू मागणे हे भ्रष्टाचारात मोडते. कुणा महिलेकडे लोकसेवकाने शरीरसुखाची मागणी केली तरी ती भ्रष्टाचारात मोडते. अशी मागणी करणार्‍या स्त्रीलंपट लोकसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना जेलमध्ये जावे लागले आहे. या विश्वात सढळहस्ते शासकीय उपक्रमांना मदत करणार्‍या बर्‍याच सामाजिक संस्था आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांनी आमदार असताना आझाद मैदान, लोकमान्य टिळक मार्ग असो अथवा मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे असो, आपल्या आमदार फंडातून बर्‍याच पोलीस ठाण्यांचा कायापालट केला आहे, यंत्रसामग्री पुरविली आहे, व्यायामशाळा बांधल्या आहेत (पोलिसांसाठी). तेव्हा पोलिसांना कुणाकडे लाच मागण्याची गरज नाही, दानशूर व्यक्ती बर्‍याच असतात. कुणा फौजदाराने अथवा शिपायाने लाच मागितली, पकडला गेला तर ती बातमी वर्तमानपत्रात ठळकपणे छापली जाते; परंतु आयकर असो, महसूल अधिकारी असो, अगदी त्यांच्या आयुक्ताला जरी 5 कोटींची लाच घेताना पकडले तरी त्या बातमीला दुय्यम स्थान दिले जाते.

पोलिसांच्या मागे ‘ग्लॅमर’ असल्याने त्याने घेतलेल्या लाचेची सर्वत्र चर्चा होते. पोलीस हा घटक समाजाच्या अगदी जवळ असल्याने त्याच्यावर अधिक टीका होते. भ्रष्टाचार सार्‍याच सरकारी यंत्रणांमध्ये आहे. रुग्णालयात शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त करण्यासाठी व स्मशानभूमीत मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी लाच मागितली जाते. त्याची पूर्तता केल्यावरच दाखला मिळतो. स्मशानभूमीतील कारकून व रुग्णालयात पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टरही लाच घेताना अनेकदा पकडले गेले आहेत, परंतु आज सर्वात जास्त बदनाम होत आहेत पोलीस! पोलिसांमधील मूठभर भ्रष्ट लोकांमुळे प्रामाणिक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कर्तबगारीवर परिणाम होत आहे. शासनाच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून भ्रष्ट पोलिसांनी तक्रारदारांना त्रास देऊ नये. त्यांच्याकडे स्टेशनरीचे साहित्य मागू नये. सर्वच तक्रारदार समजदार, दानशूर नसतात हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि आपल्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या