पोलीस डायरी – पोलिसांना ‘बाप्पा’ पावला; महिलांनो सावधान, रात्र वैऱयाची आहे

>> प्रभाकर पवार

गेल्या आठवडय़ातील शुक्रवार (10 सप्टेंबर)! अंधेरी (पूर्व) साकीनाका येथील खैरानी रोडच्या फुटपाथवर झोपणाऱया बत्तीस वर्षीय महिलेसाठी शुक्रवारची ती रात्र काळरात्र ठरली. रात्री तीनच्या सुमारास एका टेम्पोमध्ये एका महिलेला एका पंचेचाळीस वर्षीय पुरुषाकडून प्रचंड मारहाण होत असल्याचा कॉल मुंबई पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. या संदेशाची तत्काळ अंमलबजावणी झाली. साकीनाका पोलिसांची व्हॅन केवळ 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचली असता एका टेम्पोमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळय़ात विव्हळत होती. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच टेम्पोचा ताबा घेतला व टेम्पो घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाच्या दिशेने नेला व त्या जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले, परंतु तिच्या गुप्तांगामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने रक्तस्राव काही थांबत नव्हता. शेवटी रक्त आटले. तिचा श्वासोच्छ्वासही थांबला. महिलेला वाचविण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले. डॉक्टरांनी तिला काही तासांनंतर मृत घोषित केले. ही बातमी वाऱयासारखी पसरली. टीव्ही चॅनेलने या अमानुष कृत्याचे वृत्त ठळकपणे दाखविले. राजकीय पुढाऱयांनी निषेध केला. सरकारवर टीका केली, परंतु या भीषण कांडानंतर आपल्या उत्तर प्रदेशातील जौनपूर या गावी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱया मोहन चौहान या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यामुळे सगळय़ा वरिष्ठ पोलिसांचा जीव भांडय़ात पडला. आरोपी जर पळून जाण्यात यशस्वी झाला असता तर विरोधकांनी आकाशपाताळ एक केले असते. सुशांतसिंग आत्महत्येचा ‘खून’ करणाऱया विरोधकांनी राईचा पर्वत केला असता. पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली असती. महाराष्ट्र सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट आणा, अशी मागणी केली असती, परंतु मुंबई पोलिसांना गणपती बाप्पा पावला. आरोपी गुन्हा घडल्यानंतर केवळ 24 तासांच्या आत पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे पोलिसांची अब्रू वाचली, परंतु ज्या पद्धतीने त्या महिलेवर आरोपीने अत्याचार केले, तिच्या गुप्तांगात तीक्ष्ण हत्यार खुपसून तिची हत्या केली तो प्रकार अंगावर शहारे आणणारा तसेच क्रूरतेचा कळस गाठणारा आहे.

अटकेत असलेला आरोपी मोहन चौहान हा दारूडा आहे. मयत महिला व आरोपीच्या वारंवार गाठीभेटी होत होत्या. पैशांची देवाणघेवाण व्हायची. मयत महिला ही फुटपाथवर राहायची. तिला तीन मुली आहेत. त्या तिच्या आईकडे असतात, तर आरोपी मोहन चौहानला घरदार नाही. जवळच राहणारा त्याचा भाऊही त्याला घरात घ्यायचा नाही. त्यामुळे तोही कुठेतरी टेम्पो किंवा फुटपाथवर राहायचा, झोपायचा. त्यातूनच मयत महिलेशी आरोपीचे संबंध आले व शुक्रवारी रात्री देण्याघेण्याच्या व्यवहारावरून दोघांचे भांडण झाले आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला.

नऊ वर्षांपूर्वी दिल्लीत एका टोळक्याने निर्भयाला जसे बलात्कार करून ठार मारले होते तशीच साकीनाका येथील काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना आहे. हे जरी खरे असले तरी आज आपल्या देशात कोणतीही महिला असो, लहान बालकं असोत, ती सुरक्षित नाहीत. आज प्रत्येक महिलेकडे एक भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. कामातुर नराधमांचे अधःपतन झाले आहे हेच खरे! अगदी लहान लहान असहाय्य मुलींना ‘लक्ष्य’ केले जात आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा खूनही केला जात आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री महिलांनी फिरणे धोक्याचे झाले आहे. गार्डन किंवा निर्जन ठिकाणी जाऊन गप्पागोष्टी, रोमान्स करणे प्रेमी युगुलांच्याही जिवावर बेतत आहे. सात-आठ वर्षांपूर्वी मुंबईच्या महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात एका पत्रकार तरुणीवर ओढवलेला अत्यंत हिणकस प्रसंग कुणीही विसरलेले नाही. ओसाड जागेत फोटोग्राफीसाठी आपल्या सहकाऱयाबरोबर गेलेल्या वीस वर्षीय तरुणीवर पाच जणांच्या टोळक्याने ती रक्तबंबाळ होईपर्यंत आळीपाळीने बलात्कार केला होता. त्या आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतर आपण त्या निर्मनुष्य जागेत रोमान्स करावयास येणाऱया प्रत्येक प्रेमीयुगुलाला शस्त्राचा धाक दाखवून मुलींवर बलात्कार करायचो, अशी कबुली आरोपींनी दिली होती. या पाच आरोपींपैकी तीन आरोपींना फाशी, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी ठोठावली. दिल्लीच्या ‘निर्भया’कांडात सामील असलेल्या आरोपींनाही फाशी देण्यात आली. तरीही आपल्या देशातील बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत. उलट त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार कुणाचेही असो, बुद्धी भ्रष्ट झालेल्या दुर्गुणांचे अत्याचार सर्वत्र सुरूच आहेत. माणूस दिवसेंदिवस क्रूर, राक्षसी बनत चालला आहे. समाजमाध्यमांतून व्हायरल होणारे अश्लील व्हिडीओ, ब्लू फिल्म दुराचारी प्रवृत्तींना खतपाणी घालत आहेत.

लोक आता नातीगोतीही विसरत आहेत. 90 टक्के बलात्कार व अत्याचाराचे गुन्हे परिचित, स्वकियांकडूनच केले जात आहेत. हे आम्ही नव्हे, तर वार्षिक गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर आपणास आढळून येईल. तेव्हा पालकांनो, आपल्या असहाय्य मुलांना सांभाळा! परिचितांवरही विश्वास ठेवू नका! महिलांना, मुलांना रात्री-अपरात्री बाहेर एकटे सोडू नका! रात्र वैऱयाची आहे. फुटपाथवर झोपणाऱया महिलेला मोहन चौहान या रानटी नरभक्षकाने बलात्कार करून ठार मारले. त्यामुळे फुटपाथवर, उघडय़ावर झोपणाऱया महिला, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

1965-66 च्या सुमारास रामन राघव नावाच्या सैतानाने साऱया मुंबईकरांना, फुटपाथवर झोपणाऱया स्त्री-पुरुषांना भयभीत करून सोडले होते. रामन राघवकडे असलेल्या एका लोखंडी आकडय़ाने तो स्त्री-पुरुषांच्या रात्री हत्या करायचा. महिलांना ठार मारल्यानंतर तो प्रेताशी सेक्स करायचा. झोपडी व फुटपाथवर झोपलेल्या दोन डझन स्त्री-पुरुषांना त्याने ठार मारले होते. हा आरोपी डोंगरी येथे ऍलेक्स फिएल्हो या फौजदाराच्या हाती लागला आणि मुंबई पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गणेशोत्सव काळातच रामन राघव पोलिसांच्या हाती लागला.  डोंगरी पोलिसांना जसा बाप्पा पावला तसा साकीनाका पोलिसांनाही पावला. त्यांनी दाखविलेली तत्परता व बाप्पाच्या आशीर्वादामुळे मोहन चौहान त्यांच्या हाती लागला. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व त्यांच्या ‘टीम’चे कौतुक करावे तितके थोडे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या