पोलीस डायरी – जिवाशी खेळणाऱ्या फसव्या जाहिराती, मुंढें’च्या मागावर तेल व ड्रग्ज माफिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार

कर्तव्यदक्ष तितकेच वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम हरिभाऊ मुंढे यांची आपल्या २१ वर्षांच्या सेवेत २४ पेक्षा अधिक वेळा बदली झाली. २००४ साली मुंढे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) दिली आणि त्यांनी देशात २० वा क्रमांक मिळविला. बीड जिल्ह्यातील तडसोना गावातील शेतकऱ्याच्या या मुलाने गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (एफडीए) म्हणून मुंबईत सूत्रे हाती घेतली. मुंढे यांनी एफडीएचे कमिशनर म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रभर धडक कारवाईचा सपाटा सुरू केला. गुटखा, पान मसाला, मिसबॅण्डेड औषधे, अगदी इथिलीन स्प्रेचा वापर करून पिकविण्यात आलेले आंबे असा एकूण सुमारे एक कोटी रुपयांचा साठा जप्त करून (२९ मे ते ३१ मे यादरम्यान) ३२ आरोपींना अटक केली. त्यामुळे भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये तूर्त घबराट पसरली आहे. जनतेच्या आरोग्याशी, जिवाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. कुठल्याही औषधांच्या भ्रामक फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन मुंढे यांनी जनतेला केले आहे.

औषध किंवा खाद्यपदार्थांवर दिशाभूल करणारी खोटी माहिती असलेली लेबले लावली जातात. त्याला Misbranded उत्पादने म्हणतात. अशी फसवणूक करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नियमांशी तडजोड न करणाऱ्या या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याबद्दल जनतेमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत. यापुढे भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध व मिसबॅण्डेड वस्तू बाजारात मिळणार नाहीत याची खात्री वाटू लागली आहे. असो. सध्या तरी एफडीएच्या गर्द अंधारात तुकाराम मुंढे हा एक आशेचा किरण दिसत आहे. परंतु या ‘तोडफोड’ अधिकाऱ्याला राज्यकर्ते एक वर्ष तरी सांभाळतील, टिकवतील काय? असा प्रश्न पडतो. राजकीय हितसंबंध मुंढेंच्या मुळावर नक्की येतील. व्हेस्टेड इंटरेस्ट असणाऱ्या सर्व गैरधंदे करणाऱ्यांचे राज्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंध असतात. ते लोक तुकाराम मुंढेंना कायदेशीर कारवाई करायला देतील हे संभवत नाही. प्रसंगी त्यांच्यावर हल्लेही करतील. पेट्रोल, डिझेल, तेलमाफियांपासून तर तुकाराम मुंढेंच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी आपल्या जिवाची काळजी घेणे. पोलीस संरक्षणात फिरणे आवश्यक आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या पानेवाडीच्या पोपट शिंदे या तेलमाफियाने काय केले? मनमाडचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे या अधिकाऱ्याला चक्क पेट्रोल ओतून जाळले. २०११ सालातील ही घटना आहे. यशवंत सोनावणे या आयएएस अधिकाऱ्याने तेलमाफिया पोपट शिंदे याच्या मनमाड येथील सागर धाब्यावर धाड टाकली होती. त्यावेळी पोपट शिंदे व त्याचा मुलगा कुणाल याने सोनावणे यांच्याशी वादावादी केली, प्रकरण हमरीतुमरीवर गेले. यशवंत सोनावणे कठोरपणे कारवाई करीत आहेत, ऐकत नाहीत असे लक्षात आल्यावर पोपट शिंदेचा १७वर्षांचा मुलगा कुणाल याने एका लोखंडी रॉडने सोनावणे याच्या डोक्यावर प्रहार केला, तर पोपट शिंदेने जवळील डब्यातले पेट्रोल सोनावणे यांच्या अंगावर टाकले आणि माचिसची काडी पेटवली. सोनावणे कापरासारखे जळाले. सोनावणे यांनी आकांत केला, परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी जळत्या अवस्थेत सोनावणे यांनी पोपट शिंदेला पकडले. त्याला मिठी मारली. त्यात सोनावणे यांच्याप्रमाणे पोपट शिंदेचाही अंत झाला.

सांगायचे तात्पर्य, भेसळ किंवा तेलचोरी करणाऱ्या माफियांना सरकारी यंत्रणांचे अजिबात भय वाटत नाही. राजकीय लांगेबांधे असल्यामुळे पोपट शिंदेसारखे माफिया आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना फाट्यावर मारतात. नव्हे, धाड घालणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर उर्मट भाषा वापरतात. यशवंत सोनावणे जळीतकांडामुळे देशभरातील तेल भेसळीवर प्रकाश पडला, त्यानंतर पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल, डिझेल मिळू लागले. आता संगणकीकरणामुळे पेट्रोल पंपावरील हेराफेरीला आळा बसला आहे हे जरी खरे असले तरी दुधात युरिया, डिटर्जंट, स्टार्च, ग्लुकोज, कॉस्टिक सोडा मिसळून ते आजही विकले जात आहे. लहान मुले, गरोदर खिया व आजारी माणसांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात काय झाले? लाच मागणाऱ्या कारकुनाला अॅण्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्याच्या कॅबिनमध्ये अलीकडे घुसून पकडले, परंतु ज्याच्यासाठी कारकुनाने लाच मागितली होती त्या अधिकाऱ्यावर कारवाईच झाली नाही. मंत्र्याची तर साधी चौकशीही कुणी केली नाही. सारी नैतिकता, मोरॅलिटी संपली आहे. तुकाराम मुंढे यांनी कारवाया जरूर कराव्यात, दुधात भेसळ करणाऱ्या संघटित टोळ्या उ‌द्ध्वस्त कराव्यात, परंतु त्यांनी जनतेप्रमाणे आपल्या जिवाचीही काळजी घेणे आवश्यक आहे. तेल माफिया, ड्रग्ज माफिया, दूध माफिया व पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी दारूत मिथेनॉलचा वापर करून २२ गरीबांचे बळी घेणारे ‘खोपडीं’ माफियाही तुमच्या मागावर आहेत एवढे त्यांनी लक्षात ठेवावे.