
प्रभाकर पवार ([email protected])
गेल्या महिन्यात (27 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास मध्य मुंबईतील वडाळा ट्रक टर्मिनस येथील झोपडपट्टी परिसरात एका प्रेमीयुगुलाबरोबर झालेल्या क्षुल्लक भांडणातून एका पंचविशीतील तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. विजय सिंग असे या तरुणाचे नाव असून तो सायन कोळीवाडा येथे राहत होता. तो एका फार्मा कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला होता. तसेच तो लवकरच विवाहबद्धही होणार होता. आपल्या होणाऱ्या भावी पत्नीबरोबर निवांत गप्पा मारण्यासाठी विजय आपल्या दोन चुलत भावांना सोबत घेऊन शांत अशा वडाळा ट्रक टर्मिनस या ठिकाणी गेला असता तेथे एक प्रेमीयुगुल compromise position मध्ये बसले होते. त्या ‘कपल’वर विजय सिंगच्या मोटारसायकलच्या दिव्याचा प्रकाश पडला. प्रखर प्रकाशामुळे खडबडून उठलेल्या प्रेमीयुगुलाने विजय सिंगने मुद्दामच आपल्या दिशेने लाईट मारून आपल्या निवांतपणाचा भंग केला असा समज करून त्यास शिवीगाळ केली. त्यातून वाद वाढला व एकमेकांना मारहाण केली. त्या तरुणीबरोबर असलेला तरुण हा स्थानिक असल्याने आरडाओरड ऐकून जवळच्या झोपडपट्ठीतील तरुण तेथे गेले. त्यांनी विजय सिंगला मारहाण केली व वडाळा टी.टी. पोलिसांना बोलावून विजयला त्यांच्या ताब्यात दिले. मुलीची छेड काढली असा आरोप करून विजय सिंगवर वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.
पण मोटारसायकलच्या हेडलाईटने विजयच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. विवाहित होऊन संसार करायचे त्याचे स्वप्न एका क्षणात भंगले. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विजय सिंग याने पोलिसांकडे पाणी मागितले. परंतु त्याला पोलिसांनी काही पाणी दिले नाही. प्रकृती गंभीर झाल्यानंतर मात्र पोलिसांनी विजयला कोठडीतून बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच विजय हे जग सोडून गेला होता.
क्षुल्लक भांडणातून एका तरुणाचा नाहक बळी गेला. पोलिसांनी त्यानंतर विजय सिंगविरुद्ध तक्रार करणाऱ्या प्रेमीयुगुलावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. परंतु विजय सिंग याच्या आईवडिलांनी पोलीस व त्या प्रेमीयुगुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनीही विजयला मारहाण केली, त्याला पाणी दिले नाही असा आरोप विजयच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे वडाळा पोलीस ठाण्याच्या 5 पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यात एक एपीआय, एक पीएसआय व 3 पोलीस शिपाई आहेत. आधीच दुष्काळ त्यात हा तेरावा महिना. वडाळा पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची इतकी कमतरता आहे की, आहे त्या अधिकाऱ्यांना घरी जायला मिळत नाही इतका कामाचा बोजा आहे. महिला अधिकाऱ्यांची तर वानवाच आहे. अशातच 5 पोलीस अधिकारी व शिपाई निलंबित झाल्याने वडाळा पोलीस ठाणेच उघडय़ावर आले आहे. पाणी मिळाले नाही म्हणून विजय सिंग या तरण्याबांड तरुणाचा बळी गेला असाही आरोप केला जातो. परंतु त्याचा नक्की कशामुळे मृत्यू झाला हे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच उघड होईल. परंतु वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांना तर रोज पिण्याच्या पाण्याशी सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत आहे.
मुंबई ही या देशाची अर्थवाहिनी आहे. अख्खा देश बांधून होईल इतका पैसा या मुंबईतून केंद्राला करापोटी दिला जातो. परंतु याच बहुरंगी-बहुढंगी मुंबईची (विशेषतः पोलीस ठाण्यांची) अवस्था दयनीय आहे. सध्याच्या डिजिटल युगात तेही मुंबईसारख्या श्रीमंत शहरात वडाळा ट्रक टर्मिनससारख्या पोलीस ठाण्यात पोलिसांना प्यायला पाणीच मिळत नाही. एमएमआरडीमार्फत पोलिसांना टँकरमार्फत रोज पाणीपुरवठा करण्यात येतो. तेही अत्यंत अपुरे व गढूळ पाणी असते. त्यामुळे वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यातील पोलीस पिण्यासाठी आपल्या घरातूनच रोज दोन-तीन लिटर पाणी बाटल्यांमधून घेऊन जातात. पाणी नसल्यामुळे प्रसाधनगृहात जाऊन लघुशंका करण्याचीही सोय नाही. त्यामुळे पोलिसांची फारच कुचंबणा होते. लघवी तुंबून ठेवली जाते. पोलिसांची जर अशी वाईट अवस्था असेल तर पोलीस ठाण्यात जाणाऱ्या व्यक्तीला काय न्याय मिळणार? त्यांना कोण आणि कुठून पाणी देणार? विजय सिंगचा पाणी न मिळाल्यामुळे जर मृत्यू झाला असेल तर त्याला शासनच जबाबदार आहे. पोलीस ठाणी बांधायची व तिथे कोणत्याच सुविधा पुरवायच्या नाहीत. सीसी टीव्ही कॅमेरे प्रत्येक पोलीस ठाण्यात बसविणे बंधनकारक आहेत, परंतु वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात सीसी टीव्ही कॅमेरेच बसविलेले नाहीत. त्यामुळेच पोलिसांनीही विजयला मारहाण केली असा आरोप विजयच्या नातेवाईकांनी केला आहे. परंतु मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासात विजयला पोलिसांनी नव्हे तर त्या प्रेमीयुगुल व त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याने उघड झाले आहे. ओसाड जागी असलेल्या पोलीस ठाण्यांना वरिष्ठांनी भेट द्यायची नाही. सीसी टीव्ही फुटेज आहेत की नाही याचीही खातरजमा करायची नाही याला काय म्हणावे? याला जबादार वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. प्रकरण अंगाशी आले की सामान्य पोलिसांना निलंबित करायचे हा कुठला न्याय? ज्या पोलीस ठाण्यात पाण्याची तसेच प्राथमिक सुविधांची सोय नाही, तेही मुंबईसारख्या प्रगत शहरात, हे फारच लांच्छनास्पद आहे.
जगात नावलौकिक असलेल्या मुंबई पोलिसांची स्वतःच्या मालकीची (म्हणजे सरकारची) पोलीस ठाणी फारच कमी आहेत. बरीच पोलीस ठाणी भाडय़ाच्या जागेत आहेत. त्यासाठी शासन दरमहा करोडो रुपये जागेच्या मालकांना भाडे देते. महाराष्ट्र सायबर सेलचे कार्यालय मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आहे. त्या जागेचे भाडेच एक कोटीच्या वर आहे. एका बाजूला सरकारची बरीच कार्यालये भाडय़ाच्या जागेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मुंबईसारख्या शहरात सरकारी भूखंडावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे होऊन तेथे झोपडय़ा उभ्या राहत आहेत. झोपडय़ा जुन्या झाल्यावर मग त्यांना पक्की घरे पर्यायी जागा म्हणून दिली जात आहेत. परंतु सरकारी भूखंडावरील अतिक्रमणे रोखण्यासाठी, ती उठविण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही. गोष्टी विकासाच्या करायच्या आणि झोपडय़ा वाढवायच्या, पोलिसांना वेठीस धरायचे. आज मुंबई शहराची लोकसंख्या इतकी भयानक वाढली आहे की, एखादा गंभीर गुन्हा सोडला तर पोलीस कुणाला न्याय देऊ शकत नाहीत. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलात तर तुमच्या पदरी निराशाच येईल. स्टाफच नाही तर पोलीस तरी काय करणार? तेव्हा जनहो, तुमच्यावर पोलीस ठाण्याची पायरी चढायची वेळ येऊ नये एवढेच सांगणे आहे.



























































