
वाहतूक नियंत्रण करून जंक्शनवर जात असताना वाहतूक पोलिसाच्या मोटारसायकलला डंपरने धडक दिल्याची घटना आज दुपारी गोरेगाव परिसरात घडली. या अपघातात दिंडोशी वाहतूक चौकीचे पोलीस नाईक पांडुरंग मारुती सकपाळ यांचा मृत्यू झाला असून ट्रफिक वॉर्डन भावेश पितळे हे जखमी झाले आहेत.अपघातानंतर पळून गेलेल्या डंपर चालका विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सकपाळ हे कांदिवली परिसरात राहत होते. वर्षभरापासून ते दिंडोशी वाहतूक चौकीत कर्तव्यास होते. आज दुपारी सकपाळ आणि ट्राफिक वार्डन भावेश हे पश्चिम द्रुतगती महामार्गच्या हब मॉल येथे वाहतूक नियंत्रणासाठी गेले होते. त्यानंतर ते मोटारसायकलने जंक्शनवर जात होते. तेव्हा मागून आलेल्या डंपरने सकपाळ यांच्या मोटारसायकलला धडक दिली. डंपरच्या धडकेमुळे सकपाळ आणि भावेश हे जखमी झाले. त्या दोघांना उपचारासाठी अंधेरीच्या होली स्पिरिट रुग्णालयात दाखल केले. सकपाळ याना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर भावेशवर सध्या उपचार सुरु आहेत. अपघाताच्या घटनेची माहिती समजताच वनराई पोलीस घटनास्थळी गेले. वनराई पोलिसांनी तो डंपर जप्त केला आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या डंपर चालकाचा वनराई पोलीस शोध घेत आहेत. सकपाळ यांच्या पश्च्यात पत्नी आणि मुले असा परिवार आहे.


































































