
सामना प्रतिनिधी । वडीगोद्री
सोलापूरहुन गुन्ह्याचा तपास करून परत येणाऱ्या पोलिसांच्या इनोव्हा गाडीला संभाजीनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर दुनगाव फाट्याजवळ अपघात झाल्याने जळगाव पोलीस हेड काँन्स्टेबल राजेंद्र हरीश पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ९ ऑक्टोंबर रोजी पहाटे १. ३० घडली.
धुळे ते येडशी राष्ट्रीय महामार्ग ५२ चे काम चालू असुन आय. आर. बी. कंपनीकडे या कामाचा ठेका घेतलेला आहे. दुनगाव फाटयाजवळ वाहनांसाठी वळण रस्ता तयार केलेल्या आहे. वळण रस्त्यावर आयआरबी कंपनीने कुठलेही दिशा दर्शक फलक लावलेले नाहीत. उलट वळणावर त्यांच्या कामाच्या जागेवर पाट्या उभा केल्या. या पाट्यांमुळे रात्रीच्या वेळी अंधारातून समोरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना वाहने दिसत नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत.
राजेंद्र हरीश पाटील (५०), समिता रघुनाथ भांडे (३५), सुधीर आनंद चौधरी (३६) तिन पोलीस कर्मचारी व चालक निसार अहेमद देशमुख (३८) चौघे रा. परांडा हे चौघे खाजगी गाडीने सोलापूर जिल्ह्यात तपासकामी गुन्ह्यातील आरोपी पूजा नवनाथ चव्हाण (२५), नवनाथ मानसिंग चव्हाण (३८) दोघे रा. सोलापूर यांना घेऊन गेले होते. तपास करून पुन्हा जळगावकडे परत जात असतानाच दुनगाव फाट्याजवळ (एम. एच. ४५-ए. ९९०९) या क्रमांकाच्या इनोव्हा गाडीतून जात असतांनाच समोरून येणाऱ्या ट्रक क्र. (एम. एच. १९, जी. आय,८७७६), यांच्यात जोराची ठक्कर झाली. या इनोव्हामधील जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून पुढे उपचारासाठी संभाजीनगर घाटी येथे दाखल केले असता यातील पोलीस कर्मचारी राजेंद्र हरिश पाटील हे उपचारादरम्यान मयत झाले.
राजेंद्र पाटील जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस ठाण्यात हेड काँन्स्टेबल पदावर कार्यरत होते. या घटनेत पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.





























































