
कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने संसर्ग होत असताना पोलीस दलात मात्र गतवेळच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिलासादायक चित्र आहे. गेल्या वेळेचा अनुभव, त्यातून घेतली जात असलेली विशेष काळजी आणि लसीकरणामुळे पोलिसांची इम्युनिटी चांगलीच वाढली आहे. यामुळे कोरोनापासून पोलीस स्वतःचा बचाव करीत असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या मार्च महिन्यात कोरोनाने घुसखोरी केल्यानंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण होते. तेव्हा नेमके काय करायचे, कशी काळजी घ्यायची याबाबत म्हणावी तशी कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी-अधिकाऱयांना मोठय़ा प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. मात्र कालांतराने व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता, मास्क, सॅनिटायझरचा वापर यामुळे पोलीस दलातून कोरोना हद्दपार होऊ लागला. असे असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक कोरोनाबाधित झाल्याचे चित्र आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची आकडेवारी पाहता पोलीस कोरोनापासून चांगल्या प्रकारे बचाव करीत असल्याचे दिसते.
आतापर्यंत पोलीस दलात 704 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 407 पोलीस घरीच क्वारंटाइन आहेत. 141 पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये असून 156पोलीस रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. गेल्या चार महिन्यांत आतापर्यंत चार कर्मचारी आणि एक अधिकारी असे पाच जण कोरोनाच्या युद्धात शहीद झाले आहेत. ही आकडेवारी पाहता पोलिसांमध्ये कोरोनाची लागण झपाटय़ाने होत नसून पोलीस कोरोनावर मात करीत असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस दलात जवळपास 80 टक्के लसीकरण झाले आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक पोलिसांना दुसरा डोसदेखील देण्यात आला आहे. याशिवाय गेल्या वेळच्या अनुभवातून पोलीस यावेळी विशेष काळजी घेत आहेत.
आठ तासांची डय़ुटी सुरू करा; पोलीस अंमलदारांची मागणी
50 वर्षांवरील तसेच गंभीर आजार असलेल्या अंमलदारांसाठी 12 तास काम आणि 24 तास आराम अशी डय़ुटी सुरू करण्यात आली आहे. मात्र असे करण्यापेक्षा सरसकट सर्व अंमलदारांची पूर्वी प्रमाणे आठ तासांची डय़ुटी सुरू करा. हे आमच्या आणि सर्वांच्या फायद्याचे ठरेल असे पोलीस अंमलदारांचे म्हणणे आहे. दरम्यान, कोरोनाचे प्रकरण परत गंभीर झाल्याने आता आयुक्तांनी 50 वर्षांवरील अंमलदारांची ‘12/24’ तास डय़ुटी सुरू केली आहे. मात्र यावर अंमलदारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. असे करण्याऐवजी सरसकट सर्वांची डय़ुटी आठ तासांची केली तर सर्वांनाच आराम मिळेल आणि स्वतःचे आरोग्य चांगले ठेवता येईल असे अंमलदारांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी याची गंभीरपणे दखल घेऊन आठ तासांची डय़ुटी सुरू करावी अशी आमची मागणी असल्याचे अंमलदारांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
























































