पोलीस निरीक्षक गोपाळे आणि कोरपेंना न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खंडणीच्या गुह्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केलेले पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  गोपाळेना आर्थररोड तर कोरकेना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. गोपाळे हे पोलीस सेवेत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारांना बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यातील काही गुन्हेगार हे सध्या आर्थररोड तुरुंगात आहे. गोपाळेंच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत जेल अधीक्षकांनी खबरदारी घ्यावी, काही वाटल्यास गोपाळेना तळोजा जेलमध्ये पाठवावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांच्यासह सात जणांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  आज गोपाळे आणि कोरकेच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने दुपारी पावणे तीनच्या सुमारास किला कोर्टात हजर केले. गोपाळे आणि कोरकेच्या सीडीआरची तपासणी करणे आवश्यक असल्याने वाढीव सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी केला.

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गोपाळेना आर्थररोड जेलमध्ये धोका असल्याचे त्याचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टात सांगितले. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने गोपाळे आणि कोरके यांच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्या जामीन अर्जावर गुरुवारी निर्णय होणार आहे.