
कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्याविरोधात पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच शनिवारी रात्री तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 11 फेब्रुवारी रोजी शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किनमळा येथील झाडीत अत्याचाराची घटना घडली आहे.
विकास वाघ हा पीडितेला 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे घेऊन गेला. तेथे त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करत ‘माझ्याविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे’ असे म्हणत तो पीडितेला गंगा उद्यान परिसरातील मिस्किनमळा परिसरात घेऊन गेला. तेथे ‘तुला पीएसआयच्या परीक्षेत मदत करतो’ असे म्हणून वाघ याने पीडितेवर अत्याचार केला. यावेळी वाघ याने मंगळसूत्र व रोख 60 हजार रुपये हिसकावून नेल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.



























































