पोलीस निरीक्षकाने व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून दोन कोटी लुटले, नवी मुंबई पोलिसांची सहा आरोपींवर झडप

मुंबई पोलीस दलातील पोलीस असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा कारनामा ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक नितीन विजयकर आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांनी केला आहे. या व्यावसायिकाची कार विजयकर आणि अन्य लुटारूंनी वाशी येथील पामबीचच्या सर्व्हिस रोडवर अडवली. व्यावसायिकाच्या गाडीच्या पुढे एक आणि पाठीमागे एक अशा दोन गाड्या फिल्मीस्टाईल उभ्या केल्या. या व्यावसायिकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी घेतली. या खंडणीखोर पोलीस निरीक्षकासह सहा आरोपींना वाशी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

घाटकोपर येथील विद्याविहार पाइपलाइन रोडवर राहणारे राजेश काटरा यांचे तुर्भे एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोअरेज आहे. शुक्रवारी ते दुपारी नेहमीप्रमाणे नवी मुंबईच्या दिशेने निघाले. दोनच्या सुमारास त्यांची कार सायन-पनवेल मार्गावरील वाशी उड्डाणपुलाखाली आली. त्यांची कार पामबीचवर जाण्यासाठी सर्व्हिस रोडवर आली असता लुटारूंनी आपली कार त्यांच्या कारला आडवी लावली. त्यांच्या कारच्या मागेही एक कार उभी करण्यात आली. तुमच्याकडे पैशांचा मोठा साठा आहे. याबाबत अनेक तक्रारी आहेत. जर केस झाली तर तुम्ही आणि तुमचे सर्वच कुटुंब यात अडकू शकते अशी भीती त्यांना दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. लुटारूंकडून होत असलेल्या दमदाटीमुळे काटरा घाबरले. त्यांनी या लुटारूंना वाशी येथील सेक्टर 29 मधील आपल्या नातेवाईकांच्या घरी नेले आणि तिथे दोन कोटी रुपये त्यांना दिले. याप्रकरणी वाशी पोलिसांनी पोलीस निरीक्षक नितीन विजयकर, मोहन पाडळे, उदय कवळे, विलास मोहिते, नारायण सावंत आणि मोहन पवार या आरोपींना अटक केली आहे.

कामावरून काढल्यामुळे ड्रायव्हरची खुन्नस

अटक आरोपींपैकी एकजण काटरा यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करीत होता. त्याला कामावरून काढल्यामुळे त्याने काटरा यांच्या कुटुंबाची सर्वच माहिती अन्य आरोपींना दिली. त्यानुसार या सर्वच आरोपींनी घाटकोपर येथून काटरा यांचा पाठलाग सुरू केला. त्यांची गाडी पामबीचच्या सर्व्हिस रोडवर आल्यानंतर आरोपींनी त्यांची गाडी अडवली.

आरोपींना पकडण्यासाठी जोरदार फिल्डिंग

दिवसाढवळ्या झालेल्या या लुटमारप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डाहणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी जोरदार फिल्डिंग लावली. या लुटीच्या मागे तोतया पोलीस नसून खरे पोलीस असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी नितीन विजयकर याची उचलबांगडी केली.