
विजापूर रोडवरील गुलमोहर ऑर्केस्ट्रा ऍण्ड बारवर पोलिसांनी छापा टाकून 47 जणांना अटक केली आहे. मध्यरात्री तीनपर्यंत सुरू असलेल्या या ऑर्केस्ट्रा बारमध्ये नर्तकीवर नकली नोटा उधळण्यात येत होत्या. या बारमधून पावणेतीन लाख रुपयांच्या रोकडसह 59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बारमालक तानाजी देवराव लकडे, चालक आकाश चंद्रकांत जाधव, वेटर शिवानंद मसळीकर, देविदास गायकवाड, गणेश गायकवाड, अभिषेक दणाणे यांच्यासह 47जणांना अटक करण्यात आली आहे.
विजापूर रोडवर गुलमोहर ऑर्केस्ट्रा ऍण्ड बार असून, रात्री पोलिसांचे एक पथक रात्रगस्त घालत असताना या बारमध्ये मोठय़ा आवाजात डी. जे. स्पीकर चालू असल्याचे आढळले. या पथकाने बारवर छापा घातला असता मुख्य मंचावर 13 नर्तकी नाचत होत्या. त्यांच्यावर ग्राहक नोटा उधळत होते. पोलिसांनी नाचणाऱया या नर्तकींना ताब्यात घेतले. खाली पडलेल्या नोटा तपासल्या असता त्या नकली असल्याचे आढळले. पोलिसांनी परवान्यामधील अटी व शर्तींचा भंग करून बेकायदेशीरपणे पहाटे सव्वातीनपर्यंत बार चालू ठेवल्याप्रकरणी मालक बारमालक तानाजी देवराव लकडे, चालक आकाश चंद्रकांत जाधव, वेटर शिवानंद मसळीकर, देविदास गायकवाड, गणेश गायकवाड, अभिषेक दणाणे यांच्यासह 47 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 2 लाख 71 हजार 380 रुपयांची रोकड, 7 दुचाकी, 8 कार, साउंड सिस्टीम असा 59 लाख 78 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरमुडे, हवालदार दिलीप भालशंकर, पोलीस नाईक योगेश बर्डे, वाजीद पटाणे, कॉन्स्टेबल संजय साळुंके, नरेंद्र नक्का यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.




























































