पावसामुळे एसीपी कार्यालयाचे छत कोसळले, ढिगाऱ्याखाली दबून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पावसामुळे एसीपी कार्यालयाचे छत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वीरेंद्र कुमार मिश्रा असे मयत उपनिरीक्षकाचे नाव आहे. गाझियाबादमधील अंकुर विहार येथील एसीपी कार्यालयात रविवारी सकाळी ही घटना घडली. वीरेंद्र मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

एसीपी कार्यालयातील एका खोलीत वीरेंद्र मिश्रा हे रात्री झोपले होते. यावेळी मुसळधार पावसामुळे अचानक खोलीतील छत कोसळले. यावेळी खोलीत झोपलेल्या मिश्रा यांच्या अंगावर ढिगारा कोसळल्याने त्याखाली दबून मिश्रा यांचा मृत्यू झाला.

मिश्रा यांचा फोन लागत नव्हता. तसेच कार्यालयातील खोलीचा दरवाजा उघडा दिसल्याने संशय आला. सहकाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता मिश्रा ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत आढळले.