हवालदारांच्या हातात काठीऐवजी मोबाईल दिसल्यास करणार बडतर्फ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऑन डय़ुटी’ असताना मोबाईल वापरणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पोलिसांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘वेळीच सुधारावे अन्यथा सेवेतून बडतर्फ करू,’ असा कडक इशारा दिला आहे. पोलीस खात्याच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर योगी यांनी पोलिसांना हा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ‘पोलीस हवालदारांच्या हातात मोबाईलऐवजी काठी असायला हवी. अनेकदा ऑन डय़ुटी असणारे पोलीस हवालदार हे मोबाईलवर सोशल मीडियावर व्यस्त असलेले दिसतात. मात्र यापुढे हे खपवून घेणार नाही. प्रत्येक पोलीस हवालदाराच्या हातात काठी हवीच. जर असे चित्र दिसून आले नाही तर त्या हवालदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा पोलीस हवालदारांना तातडीने नोकरीतून कमी करण्यात यावे, असा आदेश योगींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या बैठकीत दिला आहे.

दरम्यान, सध्या सणासुदीचे दिवस असल्याने पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे योगींना या वेळी सांगितले. सध्या उत्सवांचे दिवस आहेत. अशा वेळी चोरी, हाणामारी आणि फसवणुकीचे गुन्हे होणार नाहीत, याबद्दल विशेष काळजी घेण्याची सूचना योगी यांनी केली आहे. पोलिसांनी डायल 100च्या गाड्यांनी संवेदनशील भागांमधील गस्त वाढवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचवल्याची माहिती त्यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी दिली आहे.

दसरा आणि नवरात्रदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवणाऱया पोलीस खात्याचे योगी यांनी या वेळी अभिनंदन केले आहे. प्रशासन आणि पोलिसांनी एकत्रितपणे काम केल्याने दोन्ही सण सुरक्षितपणे पार पडल्याबद्दल योगी यांनी समाधान व्यक्त केले आहे.