
सामना प्रतिनिधी । मुंबई
फिल्मी स्टाइलने पाठलाग करून चोरटय़ाच्या मुसक्या आवळणाऱया वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राज करण बिळस्कर यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले होते. मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायसवाल यांनी बिळस्कर यांना 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
शुक्रवारी मध्यरात्री वडाळा टीटी परिसरात एक संशयास्पद गाडी बिळस्कर यांना आढळली. तेव्हा त्यांनी त्या गाडीचा वडाळा आयमॅक्सपर्यंत पाठलाग केला. ती गाडी आयमॅक्स सिनेमागृहाजवळ थांबली. बिळस्कर यांनी त्या गाडीत बसलेल्या शेखकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र शेखने गाडी सुसाट वेगात पळवली. तेव्हा बिळस्कर याने पुन्हा पाठलाग सुरू केला. शेखने प्रतीक्षानगर येथे गाडी थांबवली. तो येथील एका भिंतीवर उडी मारून पळून जात होता. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून शेखला ताब्यात घेतले. बिळस्कर यांच्या कामगिरीची माहिती कळताच मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायसवाल आणि सह आयुक्त देवेन भारती हे वडाळा टीटी पोलीस ठाण्यात पोहचले. जायसवाल यांनी बिळस्करचे कौतुक करून त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
आयुक्तांची कौतुकाची थाप
आत्महत्या करायला जात असल्याची चिठ्ठी लिहून घराबाहेर पडलेल्या एका विवाहितेचे शिताफीने लोकेशन शोधून तिचे प्राण वाचविणारे शीव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनादेखील आज आयुक्तांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. समुद्रात उडी टाकून त्या महिलेला वाचविण्याचे धडाकेबाज काम केल्यामुळे आयुक्तांनी प्रशांत कांबळे यांना 20 हजार देऊन त्यांना प्रोत्साहित केले.


























































