लस घेतलेले पोलीस कर्मचारी झाले ठणठणीत बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱया पोलीस कर्मचाऱयांसाठी दिलासादायक अशी माहिती समोर आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सर्व पोलीस कर्मचारी कोरोना होऊनही त्यातून ठणठणीत बरे झाल्याचे पोलिसांनी केलेल्या तुलनात्मक विश्लेषणातून समोर आले आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या पोलिसांना बाधित झाल्यानंतर व्हेंटिलेटरची गरज जास्त भासली, असेही यातून समोर आले आहे.

नगर जिह्यात गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. यावर्षी 1 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान जिह्यात कोरोनामुळे बाधित झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे नुकतेच तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी हे विश्लेषण केले आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांत एकही डोस न घेतल्याने कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांची संख्या 260 इतकी आहे. त्यापैकी 165 जण घरीच उपचार घेत बरे झाले, तर 95 जणांना रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची आवश्यकता भासली. त्यातील आठजणांना ऑक्सिजनवर ठेवावे लागले, तर पाचजणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यापैकी 3 जण मयत झाले आहेत.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 59 पोलीस अधिकारी व कर्मचारी हे बाधित झाले. त्यापैकी 33 जणांवर घरीच उपचार करण्यात आले, तर 26 जणांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले. त्यातील तीनजणांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली, तर एकजण व्हेंटिलेटरवर होता. पहिला डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्यांपैकी फक्त एकजण मयत झाला.

लसीचे दोनही डोस घेतल्यानंतर जिह्यातील 72 पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले. यापैकी 55 जण घरीच राहून उपचार घेत बरे झाले, तर 17 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. यापैकी अवघ्या एकालाच ऑक्सिजनची आवश्यकता भासली. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बाधित होऊन एकाचाही मृत्यू झाला नाही.

बाधित झालेल्या पोलिसांपैकी ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांचे घरीच राहून उपचार घेत बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. लस न घेता कोरोनामुळे बाधित झालेल्या 95 जणांमध्ये 18 ते 40 वयोगटातील पोलिसांचे प्रमाण 65 टक्के आहे, तर 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे प्रमाण हे 35 टक्के आहे. लस घेतल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या 26 पोलिसांपैकी 18 ते 40 वयोगटातील पोलिसांचे प्रमाणे 57 टक्के, तर 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे प्रमाण हे 43 टक्के आहे.

याशिवाय दोन डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्या पोलिसांमध्ये 18 ते 40 वयोगटातील पोलिसांचे प्रमाण हे 59 टक्के आहे, तर 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे प्रमाण 41 टक्के आहे. दोन डोस घेतल्यानंतर बाधित झालेल्या पोलिसांमध्ये 41 ते 58 वर्षे वयोगटातील पोलिसांचे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामानाने 40च्या आतील पोलिसांचे प्रमाण कमी आहे.

दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यूचे प्रमाण घटले

n प्रतिबंधात्मक लस न घेतलेले 260 पोलीस बाधित झाले होते. त्यातील तीनजण मृत्युमुखी पडले आहेत, तर पहिला डोस घेतल्यानंतर 59 पोलीस कर्मचारी बाधित झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोन्ही डोस घेतल्यानंतर 72 कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. त्यापैकी कुणाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पोलिसांचे मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.