विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’चे धडे, कुरार पोलीस ठाण्यात उपक्रम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लैंगिक शोषणाला बळी पडू नयेत म्हणून पोलीस आता शाळांमध्ये जाऊन जनजागृतीचे धडे देणार आहेत. गोरेगाव ते दहिसरच्या झोपडपट्ट्यांमधील शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्याची सुरुवात मंगळवारपासून होणार आहे.

मुंबईत सरकारी आणि खासगी माध्यमाच्या मिळून चार हजार शाळा आहेत. काही शाळा या झोपडपट्ट्यांनजीक आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटना या पूर्वी शहरात घडल्या आहेत. बदनामी किंवा भीतीपोटी पालक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्याची दखल घेत मुंबई पोलिसांनी ‘पोलीसदीदी’ हा उपक्रम सुरू केला. महिला पोलीस अधिकारी या शाळांमध्ये जाऊन त्या नकोशा स्पर्शाची माहिती विद्यार्थ्यांना देऊ लागले. पोलीसदीदीमुळे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या घटनेची वाचा फोडली. त्यामुळे नकोसे कृत्य करणार्‍या हैवानांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.

उत्तर प्रादेशिक विभागात (गोरेगाव ते दहिसर) बहुतांश झोपडपट्टय़ा आहेत. पालिका शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी पुढाकार घेऊन ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याकरिता काही शाळांची निवड केली आहे. शाळा भरण्यापूर्वी आणि सुटल्यावर पालक गोळा होतात तेव्हा महिला पोलीस अधिकारी हे शाळेत जाऊन जनजागृती करणार आहेत. नकोसे स्पर्श कसे ओळखावे, असे कोणी करत असल्यास काय करावे याची माहिती पोलीस मुलाना देणार आहेत. मंगळवारपासून कुरार पोलीस ठाण्यातील एका शाळेत जाऊन पोलीस जनजागृतीपर उपक्रम राबवणार आहेत.

जवळच्या व्यक्तीच करतात घात

उत्तर प्रादेशिक विभागात बालकाबाबत लैंगिक अत्याचाराच्या 15 घटनांची नोंद आहे. जवळच्याच व्यक्ती मुलांचे शोषण करत असल्याचे काही प्रकरणांमध्ये पोलिसांना आढळून आले आहे. त्यामुळे पालकांना देखील ‘गुड टच, बॅड टच’ची माहिती पोलीस समजावून सांगणार आहेत.