
सामना प्रतिनिधी, मुंबई
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच महाराष्ट्रातही राजकीय आघाडय़ांवर भेटी-गाठीच्या नौबती झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनदिवसीय बैठकीचे मिशनच 2019 ची लोकसभा निवडणूक असून काँग्रेसशी आघाडी करताना काय काय पदरात पाडून घ्यायचे याचा हिशेब या बैठकीत होणार आहे. तर दुसरीकडे भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि लोकतांत्रिक जनता दलाच्या प्रमुखांनीही भाजपविरोधी गुफ्तगू केले आहे.
आंबेडकर-शेट्टी यांच्यात चर्चा
शेतकऱयांच्या आत्महत्या, इंधन दरवाढ, बेरोजगारी, महागाई, तरुणांमधील अस्वस्थता, दलित अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजातील भीतीचे वातावरण यामुळे भाजपविरोधात असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी उभारण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी आणि कपिल पाटील यांची आज बैठक झाली.
दादर पूर्व येथील राजगृहावर ही बैठक झाली. भाजपच्या विरोधात आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने तिघांमध्ये दोन तास चर्चा झाली. राज्यात होणाऱया शेतकऱयांच्या आत्महत्या, इंधन दरवाढ, वाढती बेरोजगारी आणि महागाई, तरुणांमधील अस्वस्थता, दलित अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजात असणारी भीती यामुळे भाजपविरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अधिक लवचिक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन व विरोधकांना सोबत घेऊनच पुढे गेले पाहिजे. भाजपला सत्तेवरून दूर करणे हाच विरोधी पक्षांचा एकमेव कार्यक्रम असायला हवा असे मत खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.
निवडणूक लढवणार नाही… उगाचच नावाची चर्चा नको!
आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्याच्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज पूर्णविराम दिला असून मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्या नावाची उगाचच चर्चा करू नका, अशी तंबी पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली.
summary- political meetings happening in maharashtra over election



























































