
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
17 व्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी चार टप्पे बाकी आहेत. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधक काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. याच दरम्यान भोपाळमधून भाजपने जामिनावर बाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. जामिनावर असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढण्याची संधी दिल्याने भाजपच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकाही केली. परंतु फक्त भाजपच नाही तर काँग्रेससह अन्यही विरोधक पक्षांतून जामिनावर बाहेर असणारे नेते यंदा निवडणूक लढवत आहेत. कोण आहेत हे नेते पाहूया…
प्रज्ञा सिंह ठाकूर –

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. परंतु 13 मे, 2016 ला एनआयएने पुराव्यांच्या अभावामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह पाच आरोपींवरील आरोप मागे घेतले होते. यानंतर 25 एप्रिल, 2017 ला स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालायने सशर्त जामीन मंजूर केला होता. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे कडवे आव्हान असणार आहे.
सोनिया गांधी –

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी जामिनावर आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची स्थापना 1938 मध्ये हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. हे वर्तमानपत्र 2008 साली बंद झाले होते. ‘यंग इंडियन’ नावाच्या कंपनीने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ कंपनीला केवळ 90 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले होते. यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहे. याप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात धाव घेतली होती. सध्या हे प्रकरणी न्यायालयात असून 19 डिसेंबर, 2015 मध्ये सोनिया गांधी यांना जामिनावर सोडले होते. जामिनावर असणाऱ्या सोनिया गांधी यंदा आपला पारंपारिक मतदारसंघ रायबरेली येथून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह उभे आहेत.
राहुल गांधी –

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देखील नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी जामिनावर आहेत. यंदा राहुल गांधी पारंपारिक मतदारसंघ अमेठीसह केरळमधील वायनाड येथून निवडणूक लढवत आहेत. अमेठीमध्ये त्यांच्यासमोर भाजपच्या स्मृती इराणी यांचे आव्हान आहे, तर वायनाडमध्ये तुषार वेल्लापल्ली हे एनडीएचे उमेदवार असणार आहेत.
शशि थरूर –

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरूर पत्नी सुनंदा पुष्कर हत्ये प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. थरूर यांनी सुनंदा पुष्कर यांच्याशी 2010 मध्ये लग्न केले होते आणि 17 जानेवारी, 2014 ला एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आढळला होता. एम्सच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांच्या विषप्रयोग करण्यात आलेचे उघड झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी 2018 ला शशि थरूर यांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. याविरोधात थरुर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि 5 जुलै, 2018 ला त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. थरूर हे 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी केरळच्या तिरुवनंतपुरम येथून रिंगणार असून त्यांच्याविरोधात भाजपचे कुम्मनम राजशेखरन आणि सीपीआयचे सी दिवाकरण निवडणूक लढवत आहेत.
कन्हैया कुमार –

जेएनयूमध्ये देशविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल असणारा विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार हा देखील जामिनावर बाहेर आहे. एबीव्हीपीच्या तक्रारीनंतर कन्हैया आणि त्याच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 12 फेब्रुवारी 2016 ला त्याला अटक करण्यात आली होती आणि 26 ऑगस्ट 2016 ला त्याची जामिनावर सुटका झाली होती. 32 वर्षीय कन्हैया यंदा बिहारमधील बेगुसरायमधून सीपीआयच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. त्याच्याविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह आणि राजदचे तनवीर हसन शड्ड ठोकून आहेत.
पप्पू यादव –

बिहारमधील जन अधिकार पक्षाचा नेता पप्पू यादव यांच्यावर पोलिसांसोबत दुर्व्यवहार आणि आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल आहे. मार्च 2019 ला या दोन्ही प्रकरणामध्ये त्याला जामीन मंजूर झाला होता. यातील एक प्रकरणी 25 वर्ष जुने आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पप्पू यादव राजदच्या तिकीटावर निवडणूक लढला होता. आता त्याने स्वत:चा पक्ष जन अधिकार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. बिहारमधील मधेपुरा मतदारसंघातून पप्पू यादव निवडणुकीच्या रिंगणात असून राजदचे शरद यादव आणि जदयूचे दिनेश चंद्र यादव यांचे आव्हान त्याच्यासमोर आहे.
























































