
मिंधे गट आणि अजित पवार गटामधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या धमक्या देत आहेत. अजित पवार गटाने सात दिवसांत मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचे घोटाळे जाहीर करण्याचा इशारा दिला आहे तर मिंधे गटाने दादा गटाच्या सुनील तटकरे यांना उघडे पाडण्याची धमकी दिली आहे.
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि रायगडमधील मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरात यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गोगावलेंनी तटकरेंवर टीका करताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यावर अजित पवार गटाचे प्रवत्ते आनंद परांजपे यांनी मिंधे गटाच्या या तीन आमदारांचा रायगडमधील थ्री इडियट्स असा उल्लेख केला. गोगावलेंनी रायगडमध्ये केलेले घोटाळे, जिल्हा परिषदेत बांधकाम सभापतीपदी असताना केलेले घोटाळे सात दिवसांत बाहेर काढण्याचा इशारा परांजपे यांनी दिला आहे. त्यावर आपला एक जरी घोटाळा बाहेर काढला तर मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देईन, अशी दर्पोक्ती गोगावले यांनी केली आहे.































































